19972
गणेश जयंती सोहळ्यामुळे
असलदे परिसर चैतन्यमय
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २५ ः असलदे दिवाणसानेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डबलबारी भजन सामन्यात बुवा सुशील गोठणकर व शुभम पाळेकर यांच्या सुमधुर गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
असलदे दिवाणसानेवाडी येथील श्री गणेश मंदिरात सकाळी श्रींच्या मूर्तीला अभिषेक करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्री सत्यनारायण, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी परिसर चैतन्यमय झाला. दुपारी महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला. रात्री संगीत भजन, ९.३० वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ बुवा सुशील गोठणकर विरुद्ध श्री मालवीर भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडी बुवा शुभम पाळेकर यांचा २०-२० डबलबारी सामना रंगला. या सर्व कार्यक्रमांचा गणेशभक्तांनी उपस्थित राहून लाभ घेतल्याबद्दल दिवाणसानेवाडी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.