दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २५ : नवीन वर्षापासून उल्हासनगरातील शासकीय प्रसूतिगृहात महिलेला डिस्चार्ज मिळताच तिच्या बाळाचा जन्मदाखला त्वरित देण्याचा उपक्रम प्रगतिपथावर सुरू करण्यात आला आहे. अधीक्षक डॉ. शशिकांत डोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राबवलेल्या या उपक्रमांतर्गत अवघ्या पंधरवड्यात २० जन्मदाखले पालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे जन्मदाखल्यासाठी होणाऱ्या वारंवार फेऱ्या टळल्या आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक ४ परिसरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर असलेले शासकीय प्रसूतीगृह हे नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी यापूर्वी प्रसूतीनंतर बाळाचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी पालकांना साधारण १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. तसेच दाखला मिळवण्यासाठी अनेक वेळा रुग्णालयात ये-जा करावी लागत असल्याने पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, अधीक्षक डॉ. शशिकांत डोडे, डॉ. यशवंत सदावर्ते, रोशनी देखाटे, चेतनसिंह ठाकूर, मनीषा कुलकर्णी, विना संखे, पूजा भागवत यांच्यासह संपूर्ण पथकाने हा प्रश्न लक्षात घेऊन नव्या वर्षापासून प्रसूत महिलेला डिस्चार्ज देताना तिच्या बाळाचा जन्मदाखला थेट तिच्या हाती देण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे महिलावर्गात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद
नुकतीच एका महिलेची या शासकीय प्रसूतीगृहात प्रसूती झाल्यानंतर डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी तिच्या बाळाचा जन्म प्रमाणपत्राचा दाखला त्वरित सुपूर्द केला. त्या वेळी संबंधित महिलेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डॉक्टरांनाही समाधान मिळाले. याप्रसंगी डॉ. सदावर्ते, रुग्णालय कर्मचारी रिटा पिल्ले, दाखला विभागाचे ईश्वर चव्हाण, चेतन ठाकूर, विक्रम राठोड उपस्थित होते.
पूर्वी तांत्रिक अडचणींमुळे जन्मदाखला देण्यास विलंब होत असे. मात्र, नव्या वर्षापासून जन्मदाखल्याची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणण्यात आली आहे. डिस्चार्जच्या वेळीच दाखला दिला जात असल्याने पालक आनंद व्यक्त करत आहेत.
- डॉ. शशिकांत डोडे, अधीक्षक
उल्हासनगर : बाळाच्या पालकांना जन्मदाखला देताना शासकीय प्रसूतीगृहाचे पथक.