Padma Awards 2026 : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, सरकारची घोषणा!
Tv9 Marathi January 26, 2026 06:45 AM

Bhagat Singh Koshyari : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. सरकार दरवर्षी या पद्म पुरस्कारांची घोषणा करते. यावेळीदेखील अशाच काही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर जाले आहेत. या पुरस्करांच्या यादीत महाराष्ट्रातील काही मान्यवरांचाही समावेश आहे. यात महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, अर्मिडा फर्नांडिस श्रीरंग लाड यांचा समावेश आहे. असे असतानाच आत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनादेखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंक्षी शिबू सोरेन यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीत यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असताना कोश्यारी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कोश्यारी यांच्या विधानांमुळे भाजपा पक्ष चांगलाच अडचणीत सापडला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे विधान कोश्यारी यांनी केले होते. तसेच मुंबईबद्दल बोलताना या शहरातून गुजराती लोक निघून गेले त्यांनी पैसे काढून घेतले तर मुंबईचे काय होईल, मुंबईत पैसा शिल्लक राहील का? असंही आक्षेपार्ह विधान केलं होतं.

महात्मा फुले यांच्यावरही वादग्रस्त विधान

कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलताना केलेल्या विधानामुळे तर मोठा वाद झाला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे लग्न झाले तेव्हा ते अनुक्रमे 12 आणि 10 वर्षांचे होते. लग्न झाल्यानंतर या वयातील मुले काय करत असतात? असं ते म्हणाले होते. तसेच रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु आहेत, असेही ते म्हणाले होते. एकूणच त्यांची महाराष्ट्रातील राज्यपालपदाची कारकीर्द वादळी आणि वादग्रस्त राहिलेली आहे. याच भगतसिंह कोश्यारी यांना आता पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.