मराठी BMC Election 2026: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यसंख्येवरून सुरू झालेल्या चर्चांमुळे भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde faction) संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, संयुक्त गट नोंदणी केल्यास पुढील पाच वर्षे महापालिकेत भाजपचेच धोरण स्वीकारावे लागेल आणि शिंदेसेनेचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल, ही बाब लक्षात घेता शिंदेसेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला (BMC Election 2026) दहा दिवस उलटून गेले असले, तरी बहुमत मिळालेल्या भाजप–शिंदेसेना युतीने अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्षपद तसेच सदस्यसंख्येवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सविस्तर चर्चा सुरू होती. विशेषतः पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीतील सदस्यसंख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्यसंख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रत्येकी 13-13 सदस्य स्थायी समितीवर जातील, अशी स्थिती आहे.
भाजप आणि शिंदेसेनेची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधारी गटाचा एक सदस्य वाढू शकतो. मात्र, संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप-शिंदेसेनेचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्व समित्यांमध्ये भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदेसेनेला बंधनकारकरीत्या समर्थन द्यावे लागेल. याशिवाय, महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयाऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. समित्यांवर शिंदेसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचे, याचा अंतिम निर्णयही भाजपच्या गटनेत्याकडे राहील, अशी अट असण्याची चर्चा होती.
सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार स्वतंत्र नोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 आणि शिंदेसेनेचे 3 सदस्य जाण्याची शक्यता आहे. मात्र, संयुक्त गट झाल्यास शिंदेसेनेचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे, याचा अधिकार भाजपकडेच राहिला असता. यामुळेच शिंदेसेनेने स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे महापालिकेत भाजप-शिंदेसेना युती कायम असली, तरी सत्तेतील समतोल आणि समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा