पंचवटी: शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा ‘लाल तुफान’ मोर्चा शनिवारी (ता. २४) रात्री नाशिक शहराच्या हद्दीत धडकला आहे. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील वन विभागाच्या परिसरात त्यांनी मुक्काम ठोकला आहे. मोठ्या प्रमाणात वाहने मोकळ्या जागेत उभी राहिली आहेत. रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी पोहोचतच होते.
दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, पेठ, हरसूल, त्र्यंबक, घोटी, इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील, तसेच शहरी भागातील मोर्चेकरी पिंपळणारे येथून दुपारी चारला निघाले. रात्री नऊपर्यंत हजारो आंदोलक म्हसरूळला पोहोचले. माजी आमदार जे. पी. गावित, भिका राठोड, जनार्दन भोये, उत्तम कडू, इंद्रजित गावित, विजय घांगले, वसंत बागूल अग्रभागी आहेत.
जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनजमीन व गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे, शिक्षणाचे खासगीकरण थांबवणे आणि पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना देणे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा नाशिक शहरातून मुंबईकडे जाणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी (ता. २३) सकाळी हा मोर्चा दिंडोरी येथील संस्कृती लॉन्सपासून निघाला होता.
Solapur politics: दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपची गटबाजी उघड; सुभाषबापूंचा इशारा, सावध विरोधकांनी साधला ‘डाव’!नगरसेवक मदतीला
म्हसरूळच्या प्रभाग एकमधील नगरसेवक प्रवीण जाधव यांनी मोर्चातील आदिवासी बांधवांची भेट घेतली. परिस्थिती बघून त्यांनी तत्काळ पिण्याच्या पाण्याचे सात टँकर उपलब्ध करून दिले. वीजपुरवठ्याचीही सोय करून दिली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.