अभिनेता विजय याच्या पक्षाचा दावा
व्रतसंस्था/ महाबलीपुरम
अभिनेता विजय याचा पक्ष टीव्हीकेचे महासचिव आदव अर्जुन यांनी रविवारी मोठा दावा केला आहे. टीव्हीकेकडे द्रमुक, अण्णाद्रमुक आणि व्हीसीकेमध्ये स्लीपरसेल आहेत. आमच्याकडे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातही स्लीपर सेल आहेत असा दावा अर्जुन यांनी महाबलीपुरम येथे पक्षाच्या राज्य अन् जिल्हास्तरीय विचारविनिमय बैठकीला संबोधित करताना केला आहे.
टीव्हीके नेता विजय यांच्याकडे द्रमुक आणि अण्णाद्रमुक दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये समर्थक आहेत, ही स्थिती पक्षाची शक्ती दर्शविणारी आहे. विजय हेच तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होणार हे लोक जाणून आहेत असा दावा त्यांनी केला आहे. बैठकीला पक्षप्रमुख विजय उपस्थित होते आणि पक्ष राज्यात द्रमुकला सत्तेवरून पायउता करण्याच्या उद्देशाने निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे.
आर्थिक मदतीच्या योजनांवर टीका
टीव्हीके नेत्याने अन्य पक्षांनी महिलांसाठी घोषित केलेल्या आर्थिक मदतीच्या योजनांवर टीका केली. महिलांनी पुढील पाच वर्षे या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये. आमचा पक्ष तामिळनाडूच्या महिलांवर मजबूत विश्वासासह सुरू करण्यात आला असल्याचे अर्जुन यांनी म्हटले आहे.