Border 2 Box Office Collection: सनी देओलची बहुप्रतिक्षित फिल्म ‘बॉर्डर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे . पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग घेतल्यानंतर शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आणि रविवारी तर अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुल बोर्ड लागले. ‘बॉर्डर 2’ने 2026 मधील ओपनिंगला धडाकेबाज कमाई करत वॉर फिल्मच्या आखाड्यात शड्डू ठोकला. लहान लहान गावांमध्येही बॉर्डर 2 ची क्रेझ प्रचंड वाढलीय. वर्षाची सुरुवात होताच बॉर्डर 2 ची एन्ट्री झाली. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला असून अवघ्या तीन दिवसांतच मागील वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
शुक्रवारी 32 कोटींची धमाकेदार ओपनिंग करणाऱ्या ‘बॉर्डर 2’ने शनिवारी 40 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. मात्र रविवारी सकाळपासूनच चित्रपटाची क्रेझ वेगळ्याच लेव्हलवर दिसून आली. दिल्ली-मुंबईसह लहान शहरांमध्येही सकाळपासून 80 टक्क्यांपर्यंत ऑक्युपन्सी पाहायला मिळाली. संध्याकाळनंतर तर चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. रात्री उशिराचे शोही 85 टक्क्यांहून अधिक भरलेले दिसले. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, रविवारी ‘बॉर्डर 2’ने 56 ते 58 कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे.
रविवारच्या कमाईनंतर ‘बॉर्डर 2’चं एकूण नेट वीकेंड कलेक्शन 128 कोटींच्या पुढे गेला आहे. या आकड्यांसह चित्रपटाने मागील वर्षातील दोन मोठ्या हिट्स ‘धुरंधर’ आणि ‘छावा’ यांनाही मागे टाकलं आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या तीन दिवसांत सुमारे 106 कोटींची कमाई केली होती, तर ‘छावा’चा वीकेंड कलेक्शन 121 कोटी होता. 2025 मधील सर्वात मोठा वीकेंड कलेक्शन ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर 2’ने केला होता, मात्र त्या 130 कोटींच्या कमाईत 4 दिवसांचा समावेश होता, कारण चित्रपट गुरुवारी रिलीज झाला होता. फायनल आकड्यांमध्ये ‘बॉर्डर 2’चा नेट वीकेंड कलेक्शन 130 कोटींपेक्षाही पुढे जाण्याची शक्यता आहे. 2024 च्या अखेरीस आलेल्या ‘पुष्पा 2’नंतर ‘वॉर 2’ने मोठा वीकेंड दिला होता, मात्र आता ‘बॉर्डर 2’ त्यालाही मागे टाकेल, असे संकेत आहेत.
चित्रपटासाठी प्रेक्षकांचा वर्ड ऑफ माउथ जबरदस्त आहे. त्यातच सोमवारचा प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस, त्यामुळे सोमवारी म्हणजे आजही ‘बॉर्डर 2’ पुन्हा एकदा 50 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, अशी जोरदार चर्चा आहे.