महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपकडून सन्मान, कोश्यारींना पद्मभूषण मिळताच राऊत कडाडले
Marathi January 26, 2026 12:25 PM

संजय राऊत: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांना पद्म पुरस्कारांनी उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. यामध्ये पाच राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याच मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! असं ट्वीट करत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना (भगतसिंह कोश्यारी) मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केल्याचे संजय राऊत म्हणाले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपाल म्हणून ते संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकार काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळीदेखील भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापनेवेळी देखील भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच गोव्याच्या राज्यपालपदाचादेखील अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीदेखील होते.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहावर अवमानकारक टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या:

Padma Awards : धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, 131 जणांची यादी

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.