भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेला फटका; मुंबईतील दहा उमेदवारांचा पराभव, युतीधर्म पाळला असता तर...
एबीपी माझा वेब टीम January 26, 2026 12:43 PM

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Maharashtra Municipal Election) भाजपसह महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये (Mumbai Municipal Election 2026) ठाकरेंच्या शिवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका बसल्याचेही बघायला मिळालं. अशातच भाजपच्या (BJP) बंडखोरांमुळे शिवसेनेच्या (Shiv Sena) दहा उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीत लढत असतानाही जवळपास 30 प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 10 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे त्यापेक्षा जास्त मतं भाजपच्या बंडखोरांना मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्या प्रभागांमध्ये युती धर्माचे पालन झाले असते तर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या जवळ जवळ 40 च्या आसपास पोहोचली असती, असे शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai Municipal Election 2026 : मुंबई महापालिकेमध्ये 90 जागा लढणाऱ्या शिवसेनेला 29 जागांवर विजय

दरम्यान, भाजपला शिवसेनेमुळे 11 जागांवर फटका बसल्याचा एकीकडे आरोप होत असतानाच आता शिवसेनेलाही भाजपच्या बंडखोरीचा त्रास झाल्याचा प्रत्यारोप केला आहे. मुंबई महापालिकेमध्ये 90 जागा लढणाऱ्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळवता आला. महायुतीत लढत असताना काही इच्छुक नाराज होणार हे उघड होतं. शिवाय तसं प्रत्यक्षात झालं देखील. किंबहुना त्यांना वेळीच समज देणे अपेक्षित होते, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तसे न झाल्याने याचा फटका शिवसेना उमेदवारांना बसला, अशी नाराजी शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

- दिंडोशीच्या वॉर्ड क्रमांक 41 मधून मानसी पाटील या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा अवघ्या 593 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपचे मंडल सचिव दिव्येश यादव यांनी बंडखोरी केली होती. त्यांना 1260 मते मिळाली आहेत.

- वर्सोव्यातील प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा 2005 मतांनी पराभव झाला. या ठिकाणी भाजपच्या मंडळ अध्यक्ष उर्मिला गुप्ता यांनी बंडखोरी करून 2737 मते वळवली.

-सायन कोळीवाड्याच्या प्रभाग क्रमांक 173 मधून पूजा कांबळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा 4974 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना 9310 मते मिळाली आहेत. केळुसकर या भाजपच्या मंडळ अध्यक्ष आहेत.

-वांद्रे पूर्वेला पल्लवी सरमळकर यांचा प्रभाग क्रमांक 94 मधून2360 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेश्मा मालुसरे यांनी बंडखोरी करत तब्बल 6832 मते घेतली.

-अंधेरी पूर्वेच्या वॉर्ड क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला आहे. या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी केली होती. वळवी यांनी 175 मते घेतली.

-सायन कोळीवाड्याच्या प्रभाग क्रमांक 173 मधून पूजा कांबळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा 4974 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना 9310 मते मिळाली आहेत. केळुसकर या भाजपच्या मंडळ अध्यक्ष आहेत.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1 
--------------
एकूण- 227

Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.