Pune Grand Tour : 'पुणे ग्रॅंड टूर'मुळे सायकलिंग संस्कृतीला नवे बळ; स्पर्धेनंतर सायकलींबाबत चौकशी वाढली
esakal January 26, 2026 07:45 PM

- सौरभ ढमाले

पुणे - ‘पुणे ग्रॅंड टूर’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमुळे शहरात सायकलिंगविषयी नव्याने उत्साह निर्माण केला. विविध समाज माध्यमांवर सायकलिंगबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या उत्साहाचा सकारात्मक परिणाम हा शहरातील सायकल बाजारपेठेवर दिसून आला.

स्पर्धेनंतर सायकलींबाबत चौकशी करणाऱ्यांमध्ये वाढ झाली असल्याचे शहरातील सायकल व्यावसायिकांनी सांगितले. एकूणच, ‘पुणे ग्रॅंड टूर’मुळे शहरात सायकलिंग संस्कृतीला चालना मिळाली आहे.

‘पुणे ग्रॅंड टूर’ स्पर्धेदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून आली. आंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि व्यावसायिक सायकली पाहून अनेक युवक प्रेरित झाले. फिटनेस, खेळ आणि पर्यावरणपूरक वाहतूक म्हणून सायकलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक ठळक झाला असल्याचे काही युवकांनी सांगितले. यामुळे नियमित सायकलिंग सुरू करण्याकडे अनेक तरुण वळत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील सायकल बाजारात विविध प्रकारच्या सायकलींना मागणी वाढली आहे. ‘रोड बाईक’ या प्रामुख्याने वेग आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी वापरल्या जात असून, शहरातील युवकांमध्ये त्यांची विशेष पसंती दिसून येत आहे.

‘हायब्रीड सायकली’ या शहरातील रस्ते आणि हलक्या ‘ऑफ-रोड’ वापरासाठी उपयुक्त असल्याने त्या दैनंदिन प्रवास आणि फिटनेससाठी निवडल्या जात आहेत. ‘माउंटन बाईक’ या उंच-सखल भाग, खडबडीत रस्ते आणि साहसी सायकलिंगसाठी लोकप्रिय ठरत आहेत.

सायकलींच्या किमती वयोगट आणि प्रकारानुसार बदलत आहेत. लहान मुलांसाठी सायकलींची किंमत साधारण पाच हजार ते १२ हजार रुपयांदरम्यान असून यात सुरक्षितता आणि टिकाऊपणा यावर भर दिला जात आहे.

तरुण आणि प्रौढांसाठी उपलब्ध सायकली या १० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत असून, गिअर, हलकी फ्रेम, डिस्क ब्रेक्स आणि आरामदायी डिझाइन ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. काही ग्राहक स्पर्धात्मक दर्जाच्या सायकलींबाबतही माहिती घेत असल्याचे दिसून येत आहे.

सायकलिंगकडे केवळ खेळ म्हणून नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैली म्हणून देखील पाहिले जात आहे. बाजारपेठेतही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात हा उत्साह कायम राहिल्यास पुणे सायकलिंगसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक दृढपणे पुढे येईल, अशी अपेक्षा सायकल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

‘पुणे ग्रॅंड टूर’नंतर सायकल खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेषतः तरुण ग्राहक हे हायब्रीड सायकलींबाबत अधिक माहिती घेत असून येत्या काही दिवसांत सायकलींच्या विक्रीत वाढ होणार हे स्पष्ट आहे.

- जगदीश सिंग, सायकल व्यावसायिक

‘पुणे ग्रॅंड टूर’ स्पर्धा पाहिल्यानंतर नियमित सायकलिंग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची तयारी आणि शिस्त पाहून फिटनेसकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज भासली.

- ओंकार देशमुख, युवक

सध्या सर्व वयोगटांतील ग्राहक सायकलींबाबत चौकशी करत आहेत. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येकासाठी योग्य सायकल कोणती, याबाबत ग्राहक जागरूकपणे प्रश्न विचारत आहेत. हे शहराच्या सायकल संस्कृतीसाठी पोषक आहे.

- मनोज गायकवाड, सायकल व्यावसायिक

मुलांच्या आरोग्यासाठी सायकल हा चांगला आणि सुरक्षित पर्याय वाटतो. ‘पुणे ग्रॅंड टूर’नंतर मुलांमध्येही सायकलिंगची आवड वाढली असून, त्यांना बाहेर खेळण्याची सवय लागावी म्हणून सायकल घेण्याचा विचार करत आहोत.

- स्नेहा सामंत, पालक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.