तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील उमेदवारांना २७ जानेवारीला चिन्हवाटप होणार आहे. त्याच दिवशी दुपारपासून प्रचाराला प्रारंभ होईल. निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांना कोणत्या वस्तूसाठी किती खर्च करायचा हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. चहा आठ रुपये, जेवणासाठी ७५ रुपये तर व्हेज-नॉनव्हेज बिर्याणी आणि जेवणासाठी ७५ ते २१० रुपये निवडणूक खर्चात धरले जाणार आहेत.
निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार प्रचारानिमित्त गावोगावी फिरण्यासाठी वाहने लावतात. त्यात रिक्षासाठी दररोज १६८० रुपये, कारसाठी ३९०० ते ६००० रुपये आणि दुचाकीसाठी ५०० रुपये, असा दर निश्चित झाला आहे. याशिवाय टाटा मॅजिक, टेम्पो ट्रॅव्हल्ससाठी ४८०० ते ५७०० रुपये, बसकरिता साडेतेरा हजार व १४ हजार ४०० रुपये आणि अन्य वाहनांसाठी देखील त्याच प्रमाणात दर फिक्स आहेत. प्रचारासाठी लावलेल्या वाहनांची नोंदणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करावी लागणार आहे.
उमेदवारांना त्यांचा निवडणुकीसाठी झालेला खर्च स्पष्टपणे नमूद करावा लागणार आहे. त्यात सभा, सभेची तयारी, मंडप, सतरंजी, खुर्च्यांचा देखील खर्च असणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सदस्य पदांच्या उमेदवारांना साडेसात लाख रुपये आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना सव्वापाच लाख रुपयांचा खर्च करण्याची मुभा आहे.
प्रचार साहित्याचे दर असे...
हलगी, तुतारी, ढोलबाजा, बॅंजो पथकास प्रतिदिन ९५० रुपये, फेटा ३० रुपये, शाल ६०, नारळ २० रुपये आणि टोपी व गांधी टोपी चार रुपये, मफलर सात रुपये आणि कापडी झेंडा १२ रुपये, असा दर निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे.
नाष्टा, जेवण, चहाचे दर असे...
चहा आठ रुपये, कॉफी, दूधाचा कप दहा रुपये, शिरा, उपमा, पोहे ३० रुपये, बिस्किट पुडा ५ ते १० रुपये, थंड पेय्य २० रुपये, पाणी बाटली दहा रुपये, पाण्याचा जार ३० रुपये, व्हेज थाळी ७५ रुपये, स्पेशल थाळी १५० रुपये, नॉनव्हेज १२० रुपये, उसाचा रस १५ रुपये, लिंबू शरबत १० रुपये, वडापाव १० रुपये, समोसा-कचोरी १० रुपये, मटन बिर्याणी १४० ते २१० रुपये, चिकन बिर्याणी ९० रुपये, व्हेज बिर्याणी ७० ते ११० रुपये असे दर निश्चित झाले आहेत.