कुंपणाच्या तारेतून बिबट्याची सुटका
देझाई-बोरीगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशत
बोर्डी, ता. २५ (बातमीदार) ः तलासरी तालुक्याच्या देझाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायत क्षेत्रातील वहिंद्रा (सातडिया) येथील एका शेत कुंपणाच्या जाळीमध्ये अडकलेल्या बिबट्याने स्वतःची सुटका करून जंगलाकडे पलायन केले आहे. रविवार सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
काही दिवसांपासून मादी जातीची बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळत होती. या अनुषंगाने विभागीय वन कार्यालय बोर्डी यांच्याकडून तातडीने कार्यवाही होऊन कॅमेरेदेखील बसवण्यात आले होते. तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही बिबट्याचे दर्शन कॅमेऱ्यामध्ये होत नव्हते; परंतु रविवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास वाटेवरून जाणाऱ्या काही लोकांना बिबट्या जाळीत अडकल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती वनखाते, पोलिसांना देताच घटनास्थळी दोन्ही खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी येऊन बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु बिबट्याने तारेच्या कुंपणातून स्वतःची सुटका करून जंगलाकडे पलायन केल्याची माहिती वन सुरक्षा रक्षक प्रशांत भोसले यांनी दिली.
-------------------------
वनखाते सतर्क
या भागात बिबट्याची पिल्ले असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीती आहे. या दृष्टीने लोकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच बिबट्याचे दर्शन झाल्यास तातडीने वनखात्याला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.