प्रजासत्ताकदिनी ठाण्यात ‘पैचान कौन?’
कॉमेडीयन नवीन प्रभाकर ठाणेकरांना देणार वाहतूक नियमांचे धडे; तीन दिवसांचा ‘ठाणे कार्निव्हल’
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : देशातील महत्त्वाचे अनेक महामार्ग ठाणे शहरातून जात असल्याने शहरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या वाढत्या वाहतुकीसोबतच अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सातत्याने रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात असून, यंदा प्रजासत्ताकदिनापासून सुरू होणाऱ्या विशेष अभियानात प्रसिद्ध हास्य अभिनेते नवीन प्रभाकर ठाणेकरांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणार आहेत. ‘पैचान कौन?’ या त्यांच्या लोकप्रिय शैलीतून ते वाहनचालकांना हसत-खेळत वाहतूक नियम पाळण्याचा संदेश देणार आहेत.
ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियान - २०२६ अंतर्गत प्रजासत्ताकदिनापासून पुढील तीन दिवस शहरात विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. या निमित्ताने साकेत मैदानावर भव्य अशा ‘ठाणे कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले असून, त्यात रस्ता सुरक्षेशी संबंधित माहितीपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्निव्हलच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियम, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालनाबाबत जागरूक करण्यात येणार आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. प्रजासत्ताक दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार असून, त्यानंतर कार्निव्हलला अधिक रंगत येणार आहे.
......................
या कार्निव्हलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन, ई-वाहने, सुपर बाइक्स तसेच व्हिन्टेज कार्सचे भव्य प्रदर्शन नागरिकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. नवीन प्रभाकर या प्रदर्शनांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या हास्यविनोदातून रस्ता सुरक्षेचा गंभीर संदेश प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे. ठाणेकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुरक्षित वाहतुकीचा संकल्प करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.