इंडोनेशियातील सुलावेसी किनारपट्टीवरील एका दुर्गम आणि अल्प-शोधित भागात ६७,८०० वर्षे जुनी कलाकृती सापडली आहे. ही कलाकृती एका गुहेत सापडली आहे. ती जगातील सर्वात जुनी कलाकृती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुहेच्या भिंतीवर लाल हाताचा ठसा सापडला. ही कलाकृती मानवाने तयार केल्याचा दावा केला जातो. ( 67,800 years old rock art )
टोकेरी नखांच्या हातांचे लाल रंगांचे स्टेंसिल पाहता या क्षेत्रातून मानवी स्थलांतर कशा पद्धतीने झाले, याची सविस्तर माहिती देतात. या निरीक्षणाचे सहलेखक आणि ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ यूनिवर्सिटीतील मॅक्सिम ऑबर्ट यांच्या माहितीनुसार इंडोनेशियात सापडलेली गुफा अतिशय पुरातन असून, यामुळे गतकाळातील अतिशय पुरातन अशा संस्कृतीचा खुलासा होत आहे.
हे प्रामुख्याने हाताचे ठसे आहेत. यातील विशेष बाब म्हणजे, हे हाताचे ठसे साधे नसून त्यातील बोटांचे टोक टोकदार करण्यात आले आहेत, जे एखाद्या प्राण्यांच्या नखांसारखे दिसतात. संशोधकांनी ‘लेझर ॲबलेशन युरेनियम-सीरीज’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या कलाकृतींवर जमा झालेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या थरांचा अभ्यास केला, ज्यामुळे या कलाकृतीचा नेमका काळ समोर आला.
पुरातत्त्व विभागाला मिळालेल्या पुराव्यांमध्ये स्टेंसिल स्वरुपात असणारे हातांचे ठसे पाहता त्यामध्ये गेरूचा वापर आढळतो असे म्हटले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत अनेक गुहांमध्ये अशी भित्तीचित्र आढळली असून त्यामध्ये होणारे बदल कलाकृतीचे योग्य आयुर्मान सांगण्यास मदत करत आहेत.