मुंबई मर्डर मालाड रेल्वे स्टेशन: मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील मालाड स्थानकात शनिवारी संध्याकाळी आलोक सिंह (वय 31) या प्राध्यापकाचा पोटात चिमटा खुपसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ओंकार एकनाथ शिंदे (वय 27) या तरुणाने आलोक सिंह यांच्या पोटात चिमटा खुपसला होता आणि त्यानंतर तो पळून गेला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ओंकार शिंदे (Onkar Shinde) याला बेड्या ठोकल्या होत्या. आलोक सिंह (Alok Singh) हे गणित विषयाचे प्राध्यापक होते, ते एनएम महाविद्यालयात कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी ते नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने विलेपार्ले येथून मालाडला (Malad Railway station) येत होते. त्यावेळी ट्रेनमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरुन ओंकार शिंदे याच्याशी त्यांचा वाद झाला आणि हा सगळा प्रकार घडला. (Mumbai crime news)
आलोक कुमार सिंह हे मितभाषी आणि शांत स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांचे दोन वर्षांपूर्वी पूजा यांच्याशी लग्न झाले होते. पूजा सिंह या बीएडचे शिक्षण घेतात. ज्यादिवशी आलोक कुमार सिंह यांच्यावर ट्रेनमध्ये हल्ला झाला त्यादिवशी पूजा यांचा वाढदिवस होता. आलोक व पूजा यांनी शनिवारी संध्याकाळी डिनरला जायचा प्लॅन केला होता. त्यासाठी आलोक सिंह मालाडच्या कुरार व्हिलेज येथील आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आले पण ते घरी पोहोचू शकले नाहीत. त्यापूर्वीच ओंकार शिंदे याने त्यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. हा घाव अत्यंत खोल असल्याने आलोक सिंह यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला पूजा सिंह यांना आलोक यांचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे कुटुंबीयांनी पूजा यांना सांगितले होते. अखेर रविवारी वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी पूजा यांना आलोक यांचा मृत्यू झाल्याची बातमी सांगितली. आलोक सिंह यांचे वडील देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातील कमांडो आहेत. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर ते रविवारी मुंबईत पोहोचले. या घटनेमुळे संपूर्ण सिंह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा