मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गट, भाजप युती होणार? मुंबईत घडामोडींना वेग, ठाकरेंना अडीच वर्ष महापौर पद मिळणार?
Tv9 Marathi January 27, 2026 10:45 AM

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाला मुंबई आणि इतर एक दोन महापालिका वगळता इतर ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महापालिका निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे, आरक्षण सोडत जाहीर होताच आता सर्वच पक्षांकडून महापालिकांमध्ये आपल्या पक्षाचा महापौर कसा बसवला जाईल यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संख्याबळाचे आकडे जुळवले जात आहेत.  राज्यात काही अशा महापालिका आहेत, जिथे सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं नियोजन सुरू आहे. मात्र आता राजकारणात आणखी एक नवा प्रयोग पहायला मिळण्याची शक्यता आहे.  ती म्हणजे भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते.

चंद्रपूरमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ आहे, मात्र तरी देखील काँग्रेस सत्तेपासून दूर राहू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण आता चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसविरोधात शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, दोन अपक्ष नगरसेवक आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महापालिकेत बहुतासाठी 34 जागांचा आकडा पाहिजे. भाजपचे या महापालिकेत 24 नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे दोन आणि अपक्ष दोन असे  10 नगरसेवक होतात.   24 आणि 10 मिळून 34 चा बहुमताचा आकडा गाठला जात असल्यानं चंद्रपूर महापालिकेत आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आज मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रपूरमध्ये अडीच वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे आता भाजप शिवसेना ठाकरे गटाची ही मागणी मान्य करणार का? हे पहावं लागणार आहे.

यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची मागणी अडीच वर्ष महापौर पदाची होती. आमच्या स्तरावर आम्ही जे शक्य आहे त्याबाबत आश्वासन दिले होते. त्या संदर्भात एक स्टॅम्प पेपरही तयार झाला होता. मात्र काही लोकांनी शिवसेना ठाकरे गटाला वेगळं आश्वासन दिल्यानं प्रश्न निर्माण झाले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये काय होतं, ते बघुया असं यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.