वेस्ट इंडीजचा धडाकेबाज संघ जाहीर, टी 20 वर्ल्ड कपसाठी आक्रमक फलंदाजांची निवड, 15 जणांना संधी
Marathi January 27, 2026 07:26 AM

नवी दिल्ली: वेस्ट इंडीजनं 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी  15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे. दोन वेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजनं यावेळी शाई होपला कॅप्टन केलं आहे. लीग क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वेस्ट इंडीजनं यावेळी प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं.

वेस्ट इंडीजनं काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी टी 20 मालिका खेळली होती. त्यापैकी बहुतांश खेळाडूंना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. फलंदाजांमध्ये जॉनसन चार्ल्स, शिमरोन हेटमायर आणि ब्रेंडन किंगला संधी देण्यात आली आहे.

टी20 वर्ल्ड कप साठी वेस्ट इंडीजचा संघ : शाई होप (कर्णधार), शिमरोन हेटमायर, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्डे, जेसन होल्डर, अकील होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड

वेस्ट इंडीजनं वेगवान गोलंदाज म्हणून जेसन होल्डर, शमार जोसेफ, मॅथ्यू फोर्ड आणि जेडन सील्सला संधी दिली आहे. फिरकीपटू म्हणून अकील होसेन, रॉस्टन चेज आणि गुडाकेश मोती यांना संधी देण्यात आली आहे. एविन लुइस आणि अल्जारी जोसेफ यांना संधी मिळालेली नाही.

वेस्ट इंडीजनं दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. इंग्लंड, स्कॉटलंड नेपाळ आणि इटली यांच्यासह ते क गटात आहेत. वेस्ट इंडीजचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला स्कॉटलंड सोबत होणार आहे. बांगलादेश भारतात टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास तयार नसल्यानं त्यांच्या जागी आयसीसीनं स्कॉटलंडला संधी दिली आहे. वेस्ट इंडीजनं 2016 मध्ये शेवटचा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्याकडून संयुक्तपणे टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 फेब्रुवारीला वर्ल्ड कप सुरु होईल आणि 8 मार्चला फायनल होणार आहे.  भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. भारत ते विजेतेपद कायम राखण्यात यशस्वी होणार का याकडे देशातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.