मुंबई मालाड रेल्वे स्टेशन हत्या: मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आलोक सिंह असे असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. ते शनिवारी मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना ओंकार शिंदे याच्याशी त्यांचे भांडण झाले. त्यावेळी ओंकार शिंदे याने आलोक सिंह यांच्या पोटात धारदार चिमटा खुपसला. पोटात अत्यंत खोलवर घाव झाल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला होता. आलोक सिंह यांचे वडील अनिल सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अनिल सिंह हे राजनाथ सिंह यांचे सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे आलोकसोबत मालाड रेल्वे स्थानकात घडलेली घटना समजताच राजनाथ सिंह यांनी स्वत: मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. (Mumbai crime news)
राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून अनिल सिंह हे त्यांचे सुरक्षारक्षक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून अनिल सिंह हे राजनाथ सिंहांसोबत सावलीसारखे आहेत. ते राजनाथ सिंह यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनिल सिंह यांच्या मुलाबाबत ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळताच राजनाथ सिंहा यांनी तात्काळ फोन करुन मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्याची सूचना दिली. यानंतर झपाट्याने सूत्रे हलली आणि रेल्वे पोलिसांनी युद्धपातळीवर आलोक सिंह यांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली.
आलोक सिंह हे मुंबईतच लहानाचे मोठे झाले. राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्यामुळे अनिल सिंह हे कायम मुंबईबाहेर असायचे. त्यामुळे आलोक सिंह त्यांच्या काकांकडेच राहायचे. अंधेरीतील बॉम्बे केंब्रिज शाळेत आलोक सिंह यांचे शिक्षण झाले. तीन वर्षांपूर्वी आलोक सिंह यांचा पूजा यांच्याशी विवाह झाला. पूजा सिंह यादेखील ठाकूर महाविद्यालयात शिक्षिका आहेत. आलोक सिंह शांत स्वभावाचे होते. ज्यादिवशी आलोक यांच्यावर हल्ला झाला त्यादिवशी पूजा यांचा वाढदिवस होता. घरी आल्यानंतर हे दोघे डिनरला जाणार होते. मात्र, त्यापूर्वी मालाड स्थानकात ओंकार शिंदे याने आलोक यांच्या पोटात चिमटा खुपसून त्यांची हत्या केली.
Mumbai News: आलोक पाऊण तास स्टेशनवर तसाच पडून राहिला, वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर….
रेल्वे पोलिसांनी आलोक सिंह यांच्या कुटुंबीयांना मालाड रेल्वे स्थानकात हल्ला झाला त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. यामध्ये आलोक सिंह हे 40 ते 45 मिनिटं रेल्वे स्टेशनवर तसेच पडून होते. यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर लवकर उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप आलोक सिंह यांचे काका सुनील सिंह यांनी केला. ओंकार शिंदे याने फक्त एकदाच धारदार चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला. मात्र, हा चिमटा नेमका आलोक सिंह यांच्या किडनीच्या भागात घुसला. त्यामुळे प्रचंड रक्तस्राव होऊन आलोक यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा
आणखी वाचा