करो या मरोच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी झाली. आरसीबीने यापूर्वी बाद फेरीत स्थान पक्कं केलं आहे. पण इतर दोन संघांसाठी चार संघात चुरस आहे. त्यात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने दव फॅक्टरचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण मुंबई इंडियन्सने पहिल्या डावात जबरदस्त फलंदाजी केली. खरं तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण जातं. त्यामुळे मोठी धावसंख्या करणं भाग होतं. त्या दृष्टीने मुंबई इंडियन्सने योजना आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. हा सामना मुंबई इंडियन्सने 15 धावांनी जिंकला आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.
मुंबई इंडियन्सकडून हिली मॅथ्यूज आणि सजीवन सजना ही जोडी मैदानात उतरली. पण संघाच्या 16 धावा असताना सजीवन सजना 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी हिली मॅथ्यूज आणि नॅट स्कायव्हर ब्रंट या जोडीने 131 धावांची भागीदारी केली. हिली मॅथ्यूजने 39 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या आणि बाद झाली. त्यानंतरही नॅट स्कायव्हर ब्रंटचा झंझावात सुरूच राहिला. हरमनप्रीत कौरसोबत तिने 42 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौर 12 चेंडूत 20 धावा करून बाद झाली. तर नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव पत्त्यासारखा कोसळला. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पावरप्लेमध्येच आरसीबीचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अवघ्या 35 धावांवर 5 गडी तंबूत परतले. त्यामुळे आरसीबीचा पराभव निश्चित झाला होता आणि झालंही तसंच.. ग्रेस हॅरिस 15, स्मृती मंधाना 6, जॉर्जिया वोल 9, गौतमी नाईक 1, राधा यादव 0 अशा धावसंख्येवर बाद झाले. ऋचा घोषने शेवटी काही फटकेबाजी केली पण हा सामना हातून गमावला होता. ऋचा घोषने 50 चेंडूत 90 धावा केल्या.
आरसीबीने हा सामना गमावल्याने थेट अंतिम फेरीचं गणित लांबलं आहे. आरसीबीने सात सामन्यात 10 गुणांची कमाई केली असून आता शेवटचा सामना शिल्लक आहे. तर मुंबईच्या आशा अजूनही कायम आहेत मुंबईने 7 सामन्यात 6 गुणांची कमाई केली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्सने 6 सामन्यात 6 गुणांची कमाई केली आहे. तर युपी वॉरियर्सने 6 सामन्यात 4 गुण कमावले आहेत. त्यामुळे अजूनही चारही संघांना प्लेऑफची संधी आहे.