पॅरिस : फ्रान्स-भारत सांस्कृतिक सहकार्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आज पॅरिसमध्ये साकार झाला. बुसी-साँ-झॉर्ज येथे उभारल्या जाणाऱ्या नव्या हिंदू मंदिरासाठी भारतातून आलेल्या पहिल्या दगडांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या समारंभाने फ्रान्समधील आपल्या प्रकारातील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्याच्या पुढील टप्प्याची सुरुवात झाली. हे मंदिर प्राचीन कारागिरीच्या पद्धती आणि सामायिक कौशल्यांच्या आधारे बांधले जाणार आहे.
भारतामधून आणलेले आणि पारंपरिक तंत्रांनी तयार केलेले हे दगड शतकानुशतके जपल्या गेलेल्या वास्तुकलेच्या वारशाचे प्रतीक आहेत. यातील काही निवडक दगड भारतातील कुशल कारागिरांनी हाताने कोरले आहेत, ज्यामध्ये पिढ्यान्-पिढ्या चालत आलेल्या प्राचीन पद्धती जपल्या गेल्या आहेत, आणि त्यानंतर त्यांचा फ्रान्सकडे प्रवास सुरू झाला. फ्रान्समध्ये, भारतीय कारागीर फ्रेंच दगडकाम तज्ज्ञांसोबत काम करतील—ज्यात नोट्रे-डाम कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीमध्ये सहभागी असलेले कारागीरही आहेत—आणि अशा प्रकारे भारतीय कोरीव परंपरा व फ्रान्सची सुप्रसिद्ध दगडकाम कौशल्ये एकत्र येतील.
मंदिर केवळ उपासनेसाठी नव्हे तर…
हा समारंभ केवळ पारंपरिक पद्धतीने कोरलेल्या दगडांच्या आगमनापुरता मर्यादित नव्हता; तो संस्कृती, मूल्ये आणि ज्ञान यांच्या संगमाचे प्रतीक होता. हे मंदिर केवळ उपासनेसाठीच नव्हे, तर संस्कृती, शिक्षण आणि समुदाय सहभागासाठी समर्पित जागा निर्माण करण्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा भाग आहे. पूर्ण झाल्यानंतर, हे मंदिर भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचे चिरस्थायी प्रतीक ठरेल. स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधी तसेच समुदाय नेते या समारंभास उपस्थित होते आणि फ्रान्ससाठी या प्रकल्पाचे महत्त्व व आंतरसांस्कृतिक समज वाढवण्यात त्याची भूमिका याची त्यांनी दखल घेतली.
पॅरिस मंदिर बांधकाम प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि BAPS UK & Europe चे विश्वस्त संजय कारा यांनी सांगितले. “भारतामधून आलेल्या पहिल्या दगडांचे आगमन हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. प्रत्येक दगडात वारसा, काळजी आणि उद्देश दडलेला आहे—सामायिक आदर आणि सहकार्याच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि फ्रेंच अभियांत्रिकी यांचा संगम यातून दिसून येतो. सेवा, नम्रता आणि सलोखा यांवर भर देणाऱ्या महंत स्वामी महाराज यांच्या मूल्ये व दृष्टीकोनाने मार्गदर्शित होत, भारतीय आणि फ्रेंच तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या प्रकल्पाचा भाग होणे हा सन्मान आहे. हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नव्हे, तर व्यापक समाजासाठीही संस्कृती, शिक्षण आणि सौहार्दाचे केंद्र बनेल,” असं संजय कारा म्हणाले.
अद्वितीय सहकार्याचे प्रतिक
फ्रान्समधील भारताचे राजदूत, महामहिम संजीव कुमार सिंगला, या विशेष सभेला उपस्थित होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “हे मंदिर एक अद्वितीय सहकार्याचे प्रतीक आहे. दगड भारतातील श्रेष्ठ कारागिरांनी घडवले आहेत आणि ते येथे, फ्रान्समध्ये, फ्रेंच दगडकाम तज्ज्ञांकडून एकत्र केले जाणार आहेत—ज्यांपैकी काहींनी नोट्रे-डाम कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीतही योगदान दिले आहे. पवित्र वास्तुकलेच्या दोन महान परंपरांचा हा संगम आहे, जो उत्कृष्टता आणि कारागिरीवरील सामायिक अभिमानामुळे एकत्र आहे, असं सिंगला यांनी सांगितलं.
आज मैत्रीच्या ब्रेसलेट्सच्या आदान-प्रदानातून प्रतीकात्मकरीत्या दाखवले गेलेले भारतीय आणि फ्रेंच कारागिरांचे मिलन हे आपल्या लोकांमधील सहकार्य, आदर आणि मैत्रीचे प्रतिबिंब आहे. हा क्षण संस्कृती, वारसा आणि सार्वत्रिक मानवी मूल्यांचा उत्सव आहे.”
ही नावीन्यपूर्ण गोष्ट
फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयातील धार्मिक व्यवहारांचे सल्लागार राजदूत जाँ-क्रिस्तोफ पोक्सेल यांनी नमूद केले. ते म्हणाले, “या प्रकल्पाची—या मंदिराची—सुरुवात ही अत्यंत नवी आणि नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. अशा प्रकारचे मंदिर फ्रान्समध्ये प्रथमच उभारले जात आहे. आपल्या दोन देशांमधील भागीदारी ही केवळ राजकीय किंवा सांस्कृतिक नाही, तर ती आध्यात्मिक आणि मानवी भागीदारीदेखील आहे.”
टॉर्सीचे उप-प्रिफेक्ट अॅलँ एनगुओतो म्हणाले की, “आजचा दिवस हा खरोखरच ‘इमारतीतील एक दगड’ आहे—फ्रेंच-भारतीय मैत्रीच्या या वास्तूतील एक मजबूत पाया, जो या समारंभाद्वारे पुढे नेला जात आहे. येथे आपण अनादी काळापासून चालत आलेल्या कलेतून तयार झालेले पूर्वजांचे दगड स्वीकारत आहोत, जे फ्रान्सच्या कुशल अभियांत्रिकीने एकत्र केले जाणार आहेत. या दोन ‘प्रतिभा’, दोन बुद्धिमत्ता, एकत्र येऊन केवळ मैत्रीच नव्हे तर—छायाचित्रे पाहता—नक्कीच तेजस्वी आणि भव्य अशी रचना उभारतील, असा मला विश्वास आहे.”