AR Rahman controversy: ज्यांना राजकारण करायचं असतं ते..; ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मनाला पटेल असं उत्तर
admin January 27, 2026 05:25 PM
[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी मान्य केलं. एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत आपलं मत मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. रहमान यांच्या सांप्रदायिकतेच्या टिप्पणीवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. यामध्ये जावेद अख्तर, कंगना राणौत, राम गोपाल वर्मा, वहिदा रहमान यांचा समावेश होता. आता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशा चर्चा काही नवीन नाहीत, गेल्या अनेक दशकांपासून समाजात आणि इंडस्ट्रीत अशा चर्चा होत असल्याचं, घई म्हणाले.

‘IANS’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत घई पुढे म्हणाले, “जातीय मुद्दे हे गेल्या बऱ्याच काळापासून समाजात चर्चेत आहेत आणि जे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करतात त्यांना अशा वादविवादांनी काही फरक पडत नाही.” यावेळी सुभाष घई यांना विचारण्यात आलं की, फिल्म इंडस्ट्री ही समाजात दिसणाऱ्या जातीय विभाजनांपासून अलिप्त आहे का? त्यावर उत्तर देताना त्यांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगितला.

“हे पहा, माझा जन्म नागपूरमध्ये झाला असून माझं शालेय शिक्षण दिल्लीत झालं आहे. आम्ही चांदनी चौकात राहायचो. ही समस्या मी आठवीत असतानाही होती, कॉलेजमध्ये गेल्यावरही होती आणि मुंबईत स्थलांतरित झालो तेव्हाही होती. जातीय सलोखा आणि अशांततेबद्दलच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. जातीय अशांतता आणि बेरोजगारी यांवर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत आहेत आणि येत्या काळातही त्यावर चर्चा होत राहील. त्याचप्रमाणे मी हेसुद्धा सांगू इच्छितो की एखाद्याच्या एकाच विधानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करून तो एक मोठा मुद्दा बनवू नका. जे लोक त्यांचं काम जाणतात, ते याने प्रभावित होत नाहीत. ते त्यांच्या कलेवर लक्ष केंद्रीत करतात. ज्यांना राजकारण करायचं आहे ते तेच करतात”, अशी प्रतिक्रिया घई यांनी दिली.

ए. आर. रहमान नेमकं काय म्हणाले?

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रेहमान यांना इंडस्ट्रीतील पक्षपातीपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या भेदभावाचा सामना केला नाही असं म्हणत अशा गोष्टींना इंडस्ट्रीतील बदलणारे पॉवर स्ट्रक्चर्स हे योगदान देणारे घटक ठरू शकत असल्याचं मत मांडलं होतं. “मला कदाचित याबद्दल कधी कळलंच नाही. कदाचित ते लपवलं गेलं असेल. पण मला यापैकी काहीही जाणवलं नाही. गेल्या आठ वर्षांत इंडस्ट्रीत बरीच सत्तांतरे झाली आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्याकडे आता सत्ता आहे. कदाचित ही एक सांप्रदायिक गोष्टदेखील असेल पण ती माझ्यासमोर दिसली नाही. मी कामाच्या शोधात नाही. मला कामाच्या शोधात जायचं नाही. मला काम माझ्याकडे यावं असं वाटतं. मी ज्यासाठी पात्र आहे, ते मला मिळेल”, असं वक्तव्य रेहमान यांनी केलं होतं.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.