अनेकांना पावसाळा किंवा थंडीमध्ये घरी बसून गरमागरम आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा नेहमी होत असते. अनेकांना बाहेरचं खाणं टाळून घरच्या घरीच चविष्ट पदार्थ तयार करून खाण्याची सवय असते.
जर तुम्हालाही थंडीमध्ये घरी काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल तर क्रिस्पी मिरची वडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य वापरून हा पदार्थ सहज घरी तयार करता येतो. चला तर मग, जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी.
क्रिस्पी मिरची वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आवडीनुसार मोठ्या हिरव्या मिरच्या घ्या. मिरची मधोमध उभी कापा, मात्र मिरची पूर्णपणे कापू नका. आता एका भांड्यात उकडलेले बटाटे, मीठ, लाल तिखट आणि धणे पावडर घालून मिश्रण नीट मळून घ्यावे. तयार हे मिश्रण चिरलेल्या मिरच्यांमध्ये भरा.
यानंतर दुसऱ्या भांड्यात बेसन, हळद, थोडा ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करावे. कढईत तेल गरम करून भरलेली मिरची बेसनाच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडावी.
मिरची वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळावेत. चांगले तळून झाल्यावर ते काढून टिश्यू पेपरवर ठेवावेत. जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. त्यानंतर क्रिस्पी मिरची वडे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाल्ल्यास त्यांची चव आणखी खुलून येते.