मुंबई : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरिजीत सिंहने (Arijit Singh) अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावुक करणारा निर्णय घेतला आहे. अरिजीतने यापुढे चित्रपटांसाठी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अरिजितने ही घोषणा केली. अरिजीत सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
आपण यापुढे कोणतेही पार्श्वगायन करणार नाही असं अरिजितने सोशल मीडियावरुन जाहीर केलं. इतक्या वर्षात आपल्याला प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभारही मानले. पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे मात्र अरिजीतने स्पष्ट केलं नाही. अरिजीत 'स्वतंत्र संगीत' आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अरिजीत सिंगच्या या घोषणेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अरिजीत सिंगने अलिकडच्या काळात बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत.
नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या काही वर्षांत मला इतके प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व श्रोत्यांचे मी आभार मानू इच्छितो. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी ते येथे संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता."
View this post on Instagram
मंगळवारी रात्री 8.30 वाजता अरिजितने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ही पोस्ट लिहित जाहीर केलं. अरिजितच्या या पोस्टखाली त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अरिजितने पार्श्वगायन सोडू नये असं अनेकांनी त्याला आवाहन केलं. तर काही जणांनी त्याच्या संगीत कारकिर्दीबद्दल आणि त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले.