३४० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
बंडखोरी, अपक्षांच्या भाऊगर्दीत अनेकांना ५०० मतांचा टप्पा गाठणेही कठीण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाणे महापलिकेच्या तब्बल अडीच ते तीन वर्षानंतर निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुती आणि आघाडीमध्ये निवडणुका लढविल्या गेल्याने जागा वाटपात कमी-अधिक जागा आल्याने महायुतीत सर्वाधिक बंडाळी उफाळून आली. त्यामुळे बंडखोरांसह हवशे नवशे गवशे असे ६४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. त्यापैकी ३०८ उमेदवारांना समाधानकारक मते मिळविण्यात यश आले आहे. तर, ३४० उमेदवारांना १६ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली असून, त्यांची अनामत रक्कम जप्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सन २०१७ मध्ये ठाणे पालिकेची निवडणूक पार पडली होती. त्याची मुदत सन २०२२ मध्ये संपुष्टात आली. मात्र, कोरोना महामारीमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुका कधी होणार अशी आस लावून सर्वच पक्षातील नेते डोळे लावून बसले होते. अखेर १५ जानेवारी रोजी ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीनंतर पार पडणाऱ्या निवडणुकीत यंदा सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या वाढली होती. १३१ जागांसाठी ६४८ उमेदवार आपले नशीब आजमाविण्यासाठी मैदानात उतरले होते. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या देखील लक्षणीय होती. त्यामुळे अनेक प्रभागात दुहेरी तर, काही प्रभागात तिरंगी लढती पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही. १३१ जागांवर ३४० उमेदवरांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामधील अनेकांना अत्यंत कमी मते मिळाली आहेत. निवडणुकीमध्ये काही उमेदवारांनी १३ हजारपेक्षा जास्त मते मिळविली तर काहींना ५०० चा आकडाही गाठता आला नसल्याचे दिसून आले.
दरम्यान, निवडणुकीला उभे राहणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांना पाच हजार व राखीव जागांवरील उमेदवारांना दोन हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. ज्या उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्केपेक्षा कमी मतदान होते त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. उर्वरित उमेदवारांची अनामत रक्कम परत देण्यात येते असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
अनामत जप्त उमेदवारांची संख्या तक्ता
प्रभाग क्रमांक अनामत जप्त उमेदवारांची संख्या
१ १४
२ १३
३ २१
४ १८
५ ०५
६ १३
७ १४
८ ०६
९ ०८
१० ०८
११ ०४
१२ ०९
१३ ०६
१४ ०७
१५ २४
१६ १४
१७ ०४
१८ ००
१९ ०२
२० ०६
२१ ०२
२२ ०७
२३ ०६
२४ १५
२५ १६
२६ ०४
२७ ०७
२८ १५
२९ १४
३० १९
३१ १५
३२ ०८
३३ १६