हमालीसाठी आंदोलनाचा पवित्रा
गोऱ्हे केंद्रावरील भातखेरदी तीन दिवसांपासून ठप्प
वाडा, ता. २७ (बातमीदार)ः आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यात धानखरेदी केली जाते. मात्र, त्यासाठीची हमालीची रक्कम वर्षभरापासून दिली गेली नसल्याने गोऱ्हे केंद्रावरील धान खरेदीची प्रक्रिया अडचणीत सापडली आहे.
आदिवासी विकास महामंडळाकडून वाडा तालुक्यात भातखरेदी केली जाते. तालुक्यात गुहीर, कळंभे, गोऱ्हे, पोशेरी, परळी, सारशी, कुडूस, कोनसई, मानिवली केंद्रावर धान खरेदी केली जाते. गोऱ्हे येथे नुकतेच वाजतगाजत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, सतरा दिवस उलटूनही धानखरेदी सुरू केलेली नाही. या केंद्रावरील हमालांची वर्षभरापासून हमाली थकली आहे. त्यामुळे वाहनांमधून गोण्या उतरवण्यास नकार दिल्याने या केंद्रावरून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाविरोधात संतापाची भावना आहे.
------------------------------------
केंद्र शासनाकडून ५० टक्के रक्कम दिली जाते. ११ रुपये ७५ पैसे प्रति क्विंटल हमालीचा दर आहे. त्याचे सुमारे २५ लाख रुपये केंद्र सरकारकडे बाकी आहेत. यासंदर्भात मुंबई येथे बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.
- राजेश पवार, उपप्रादेशिक अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, मोखाडा
----------------------------
महामंडळ हमालीचे पैसे वर्षभरापासून देऊ शकले नाही. ते शेतकऱ्यांच्या भातखरेदीचे कसे देणार. यामध्ये शासनाने त्वरित लक्ष दिले पाहिजे.
- अनिल पाटील, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त, शेतकरी