टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला गुवाहाटीत पराभूत करुन मालिका आपल्या नावावर केली आहे. आता उभयसंघातील चौथा टी 20I सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. हा सामना बुधवारी 28 जानेवारीला होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाने या मैदानात किती टी 20I सामने खेळले आहेत? तसेच त्यापैकी किती सामन्यांमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
क्रिकेट चाहत्यांना आतापर्यंत न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये भारताचा दबदबा राहिला असल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक शर्मा, इशान किशन सूर्यकुमार यादव या तिघांना रोखण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.
इशान किशन यानेही न्यूझीलंड विरूद्धच्या कामगिरीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही कडक बॉलिंग करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखलं. आता टीम इंडियाची विशाखापट्टणममधील टी 20I क्रिकेटमधील आकडेवारी पाहता न्यूझीलंडचा सलग चौथा पराभव निश्चित आहे, असं चाहते म्हणत आहेत.
भारताची विशाखापट्टणममधील आकडेवारी
टीम इंडियाने टी 20I क्रिकेटच्या इतिहासात विशाखापट्टणममध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने या मैदानात एकूण 4 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात भारताला पराभूत व्हावं लागलंय. टीम इंडियाची सध्याची कामगिरी पाहता न्यूझीलंडसाठी इथे या मैदानात विजय मिळवणं फार अवघड आहे.
विशाखापट्टणममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर
दरम्यान विशाखापट्टणमधील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी आतापर्यंत फायदेशीर ठरली आहे. खेळपट्टीतून उसळी प्राप्त होते. त्यामुळे बॉल सहज बॅटवर येण्यास मदत होते. त्यामुळे अंदाज पाहता, या मैदानात क्रिकेट चाहत्यांना हायस्कोअरिंग सामन्याचा थरार अनुभवयाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संजू सॅमसनला नो एन्ट्रीदरम्यान टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला त्याच्या निराशाजनक कामगिरीमळे चौथ्या टी 20I सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत बॅटने निराशा केली. त्यामुळे संजूबाबत टीम मॅनेजमेंट काहीही करु शकतेे.