अजित पवार यांचं बोलणं, कामाची पद्धत, प्रशासनावरील पकड महाराष्ट्राच्या मनात कायम राहील : संजय राऊत
प्रशांत बढे, एबीपी माझा January 28, 2026 02:13 PM

Sanjay Raut on Ajit Pawar Death मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचं बारामती येथील विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून अजित पवार बारामतीला निघाले होते. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण बेचव आणि आळणी होईल, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली. 

अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर : संजय राऊत 

अजितदादा पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे बेचव आणि आळणी होईल. त्यांचं व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता, त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. असं संजय राऊत म्हणाले. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावरील पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांंचं एक नातं होतं, त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहावी लागेल, असं मनात आलं नाही.  अजितदादांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीचं राजकारण केलं, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली. 

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचं म्हणनं होतं, कॅबिनेटला पूर्ण तयारी करुन येणारे नेते होते. राज्याच्या प्रश्नाचा अभ्यास त्यांना होता, विशेषत: पाणी, पाटबंधारे या संदर्भात त्यांचा अभ्यास पक्का होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम होतं. शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात आणलं. गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी शरद पवारांशिवाय राजकारणात सुरु केलं होतं, त्या राजकारणाचा अकाली अंत होईल, असं कोणाच्या ध्यानी मनी नव्हतं. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा कार्यलौकिक होता. अजित पवार यांनी त्यांना मिळालेलं पद राजकारणासाठी वापरलं पण कार्यकर्त्यांसाठी, विकासासाठी वापरलं असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे ग्रह फिरले : संजय राऊत

अजित पवार उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र दु:खात आहे. महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहिती नाही. महाराष्ट्रातील अनेक नेते काळानं हिरावून नेले. विलासराव देशमुख उमद्या वयात गेले. गोपीनाथ मुंडे उमद्या वयात गेले. आता अजित पवार उमद्या वयात गेले, असं संजय राऊत यांनी म्हटलं. ते विक्रमी संख्येनं उपमुख्यमंत्री झाले.अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणारं आहे सांगता येत नाही, असंही राऊत म्हणाले.

मविआचं सरकार बनवताना अजित पवारांची सोबत अत्यंत महत्त्वाची होती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिला फोन मला केला होता. अजित पवार आमच्यावर फार कमी टीका करायचे आम्हीच टीका करायचो, असं संजय राऊत म्हणाले.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.