Ajit Pawar Plane Crash : ज्या विमानाचा भीषण अपघात झाला, त्या VSR कंपनीचा मालक कोण? संपूर्ण माहिती समोर
Tv9 Marathi January 28, 2026 04:46 PM

राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी विमानाला आज सकाळी बारामतीत भीषण अपघात झाला. अजित पवारांचे विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या इतर चारही सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता त्यांचे हे विमान कोणत्या कंपनीचे होते, त्याचा मालक कोण याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळी ८.१० वाजता अजित पवार यांनी मुंबईहून बारामतीसाठी टेक-ऑफ केले होते. विमान साधारण ८.५० वाजता बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करणार होते. मात्र, लँडिंगच्या काही मिनिटे आधीच विमानाला अपघात झाला. हे विमान जमिनीवर आदळताच त्याला भीषण आग लागली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी शोधकार्यादरम्यान तीन मृतदेह सापडले आहेत. अद्याप सर्व मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असले तरी, प्रवाशांच्या यादीनुसार सर्व ५ जणांचा मृत्यू झाल्याचीमाहिती समोर आली आहे.

विमान कोणाच्या मालकीचे?

ज्या विमानाला अपघात झाला, ते VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते. हे प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरले जायचे. ते अत्याधुनिक जेट स्वरुपातील होते. VT-SSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता. कॅप्टन रोहित सिंग आणि व्ही. के. सिंग हे या व्हीएसआर कंपनीचे मालक आहेत. या विमानात उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जण स्वार होते.

अपघातात कोणाचा मृत्यू?
  • अजित पवार: उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.
  • विदिप जाधव: मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ (PSO).
  • कॅप्टन सुमित कपूर: विमानाचे मुख्य पायलट (PIC).
  • कॅप्टन शांभवी पाठक: को-पायलट (FO).
  • पिंकी माळी: फ्लाईट अटेंडंट.

हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे, याचा तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) केला जाणार आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सर्व मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सध्या बारामतीसह राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अधिकृत फ्लाईट प्लॅननुसार, विमानाचा प्रवास खालील वेळेत नियोजित होता. अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८.१० वाजता मुंबईतून टेक-ऑफ घेतला होता. ते बारामतीत सकाळी ८.५० वाजता पोहोचणार होते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी तीन मृतदेह सापडले असून ते तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अपघातात विमानाचे अत्यंत गंभीर नुकसान झाले असून सर्व ५ जणांचा या भीषण दुर्घटनेत अंत झाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.