मुंबई : महाराष्ट्र झोपेतून उठून आपल्या कामाला निघण्याची तयारी करत असतानाच एखाद्या मोठ्या स्फोटाचा आवाज कानात यावा, अशी बातमी येऊन धडकली. बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, अजित पवार (Ajit pawar) यांच्यासह विमानातील (Airplane) 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अन् महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दिलदार, दिलखुलास, व्हिजनरी आणि तितक्याच मिश्लील दादा नेतृत्वाच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने हळहळला. अजित पवारांसमवेत या विमानात दोन पायलट, 1 क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, पिंकी माळी या तरुण क्रू मेंबर युवतीचा मृ्त्यू झाला असून तिच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. यावेळी, तिच्या कुटुंबीयांनी आपल्या लेकीची शेवटची आठवण सांगितली.
अजित पवार यांच्यासह विमानात क्रू मेंबर असलेल्या पिंकी माळी या तरुणीचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. विमानात क्रू मेंबर असणारी पिंकी दररोज आपल्या कुटुंबियांना आवर्जून मेसेज करायची, त्यांच्याशी फोनवर बोलायची पण आज तिने जेव्हा काही प्रतिसाद दिला नाही तेव्हाच कुटुंबीयांना भीती वाटायला लागली होती आणि त्यांची भीती खरी ठरली. पिंकीचे वडील स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, काही दिवसांपूर्वी पिंकीने आपल्या वडिलांचं अजित पवारांशी बोलण करून देणार होती, पण त्यावेळी वडिलांनी फोन न उचलल्याने बोलणं होऊ शकलं नव्हतं. पुन्हा आजच्या प्रवासात पिंकी अजित पवारांशी वडिलांचं बोलणं करून देणार होती. पण, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि होत्याच नव्हत झालं. अजित पवार यांच्यासह पिंकीचाही दुर्दैवी अंत झाला. पिंकीचे पूर्ण नाव हे कर्तु शिवकुमार माळी असं असून ती मुंबईत राहत होती.
अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त समजताच विदीप जाधव यांचे कुटुंबीय सकाळीच बारामतीकडे गेले. चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदिप यांना कामावर जाताना बघितले होते, ज्यावेळी टीव्हीवर बातमी आली त्याच वेळी त्यांच्या आईने घरी रडायला सुरुवात केली, त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना समजवले. मात्र, थोड्याच वेळात कळवा पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले, त्यांची बायको कालच पनवेल इथे माहेरी गेली होती. विदिप यांना एक मुलगा एक मुलगी, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. पोलिसात असून देखील त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीचा होता, त्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली आहे.