Ajit Pawar Plane Crash : तिच्या लग्नाला वर्षही झालं नव्हतं…विमान अपघातात असा शेवट ऐकून काळीज हेलावलं
Tv9 Marathi January 28, 2026 10:46 PM

बारामतीमध्ये बुधवारी सकाळी भीषण विमान अपघात झाला. या अपघाताने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं. कारण या अपघाताने महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणजे अजित पवारांना आपल्यापासून दूर नेलं. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरुन अजित पवार यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील एक मुलगी पिंकी माळी सुद्धा आहे. ती या विमानात फ्लाइट अटेंडेंड क्रू मेंबर म्हणून होती.

हा विमान अपघात बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास झाला. जेव्हा विमान लँडिंगचा प्रयत्न करत होतं. तांत्रिक बिघाड किंवा अन्य कुठल्या कारणांमुळे विमान कोसळलं. जमिनीवर आपटल्यानंतर विमानात मोठा स्फोट झाला. विमानाला आगीच्या ज्वाळांनी ओढलं. बचाव पथक पोहोचण्याआधीच विमानातील पाचही जणांचे श्वास थांबले ते कायमचेच. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील दिग्गज नेते अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

सगळ्या गावावर शोककळा पसरली

मृतांमध्ये असलेली फ्लाइट अटेंडेंड पिंकी माळी उत्तर प्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातील केराकत तहसली अंतर्गत येणार्‍या भैंसा गावची रहिवाशी आहे. पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांचे चार भाऊ असून ते मुंबईत स्थायिक आहेत. विमान अपघातात पिंकीचा मृत्यू झाल्याची बातमी जशी भैंसा गावी पोहोचली. सगळ्या गावावर शोककळा पसरली.

एविएशन सेक्टरमध्ये ओळख बनवली

भैंसा गावी राहणारा पिंकीचा चुलत भाऊ शीतला प्रसाद माळीने जड अंतकरणाने या बातमीची पुष्टी केली. कुटुंबाला सकाळीच या दुर्देवी घटनेबद्दल समजलं. गावचे लोक एक हुशार, मनमिळावू आणि संघर्ष कन्या म्हणून पिंकीची आठवण काढत आहेत. आपल्या मेहनतीच्या बळावर तिने एविएशन सेक्टरमध्ये ओळख बनवली होती.

तिच्या लग्नाला वर्षही झालं नव्हतं

पिंकीचं असं अचानक निघून जाण परिचितांच्या मनाला जास्त लागलं कारण तिच्या लग्नाला वर्षही झालं नव्हतं. मागच्यावर्षीच तिचं लग्न झालं होतं. तिच्या आयुष्यातील आनंदाचे दिवस होते. नियतीने जो घाव घातलाय त्याने एका हसऱ्या खेळकर कुटुंबाला कधीही न भरुन येणारी जखम दिली आहे. जौनपूर जिल्हा प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी पिंकीच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केलय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.