Ajit pawar plane crash : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? DGCA नं सांगितला घटनाक्रम 
एबीपी माझा वेब टीम January 29, 2026 12:13 AM

Ajit pawar plane crash :   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात (Ajit Pawar Baramati Plane Crash)  मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याबाबतची माहिती  नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ( DGCA ) दिली आहे. 

विमान अपघाताला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम

बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ (Uncontrolled Airfield) असून, तिथल्या हवाई वाहतुकीची माहिती बारामतीमधील उड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षकांकडून किंवा वैमानिकांकडून दिली जाते. हवाई वाहतूक नियंत्रण (ATC - Air Traffic Control) कक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जबाबानुसार अपघाताचा घटनाक्रम खाली नमूद केल्याप्रमाणे आहे.

28 जानेवारी 2026 रोजी VI-SSK या विमानाचा बारामती केंद्राशी पहिला संपर्क सकाळी 08:18 वाजता झाला. विमानाचा पुढचा संपर्क बारामतीपासून 30 नॉटिकल मैल (NM - Nautical Miles) अंतरावर असताना झाला आणि त्यांना पुणे केंद्राकडून परवानगी देण्यात आली. वैमानिकांना त्यांच्या विवेकानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (Visual Meteorological Conditions) विमान खाली उतरवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

विमानातील कर्मचाऱ्यांनी वारे आणि दृश्यमानतेबाबत (Visibility) चौकशी केली असता, वारे शांत असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

त्यानंतर विमान धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे कळवले गेले, मात्र त्यांना धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी गो अराउंड (पुन्हा उड्डाण करून वळण घेणे) करण्याचा निर्णय घेतला.

गो अराउंड केल्यानंतर विमानाला त्याच्या स्थानाबद्दल विचारले असता, कर्मचाऱ्यांनी धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले. त्यांना धावपट्टी दिसताच कळवण्यास सांगण्यात आले. त्यावर, धावपट्टी सध्या दिसत नाही, दिसल्यानंतर कळवू, असे उत्तर त्यांनी दिले. काही सेकंदांनंतर त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले.

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 08:43 वाजता विमानाला धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्यासाठी परवानगी (Clearance) देण्यात आली, मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी या परवानगीला प्रतिसाद (Readback) दिला नाही.

त्यानंतर भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 08:44 वाजता धावपट्टी क्रमांक 11 च्या सुरुवातीच्या भागाजवळ (Threshold) हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आगीच्या ज्वाळा दिसल्या. तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी रवाना झाल्या.

विमानाचे अवशेष धावपट्टी क्रमांक 11 च्या सुरुवातीच्या भागाच्या डाव्या बाजूला सापडले आहेत.

विमान अपघात तपास विभागाने (AAIB - Aircraft Accident Investigation Bureau) या तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या विभागाचे महासंचालक तपासासाठी अपघातस्थळी पोहोचत आहेत. या प्रकरणाचे अधिक तपशील उपलब्ध होताच सामायिक केले जातील.

Ajit Pawar Plane Crash : विमानात कोण कोण होते?


अजित पवार
विदीप जाधव
पिंकी माळी
कॅप्टन सुमित कपूर
कॅप्टन शांभवी पाठक

कातरलेले शब्द, पाणावलेले डोळे, घोगऱ्या आवाज शरद पवार लाडक्या पुतण्याबद्दल म्हणाले, अजित, तुझ्या निर्णयक्षमतेला महाराष्ट्र मुकला!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.