मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच दु:ख व्यक्त केलंय. बारामती दौऱ्यावर येताना आज सकाळी अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला अन् अजित दादांसह विमानातील सर्वच 5 जणांचा मृत्यू झाला. क्षणार्धात ही बातमी जगभर पसरली, त्यानंतर सोशल मिडिया आणि देशभरातून अजित दादांच्या आठवणी जागवत शोक व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी, अभिनेता, खेळाडूंनीही अजित पवारांबद्दल आपल्या भावना शब्दात मांडल्या. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही दादांच्या कामाचं विशेष वर्णन केलं. तर, ऑलिंपिक विजेत्या पी.व्ही. सिंधूनेही दादांसाठी खास पोस्ट करत, मला बारामतीला येता आलं नाही, याचा पश्चाताप होत असल्याचं तिने म्हटलं.
पी.व्ही. सिंधूने तिच्या ट्विटरवरुन अजित पवारांच्या निधनासंदर्भात शोक व्यक्त केला असून दादांच्या बारामती भेटीचं माझं स्वप्न अपूर्ण राहिल्याचंही म्हटलं आहे. तुम्हाला अनेकवेळा भेटण्याचे भाग्य मला लाभले. या भेटीत प्रत्येकवेळी तुमची शिस्त, तुमची कार्यपद्धती आणि तुमचे आपल्या लोकांप्रती असलेले प्रेम पाहून मी थक्क व्हायचे. तुम्ही मला नेहमी म्हणायचा, "माझ्या बारामतीला नक्की या.. "मला वाटायचं की, जाऊ या कधीतरी अजून खूप वेळ आहे, आपण निवांत जाऊ. मात्र, असं काही घडेल आणि मला बारामतीला न जाण्याचा असा पश्चात्ताप करावा लागेल, याचा विचारही मी कधी केला नव्हता, अशी प्रतिक्रिया पी.व्ही सिंधून व्यक्त केली. तसेच, अपघातातील मृतांप्रती सहवेदना व्यक्त करत सिंधूने श्रद्धांजली अर्पण केली.
कॅप्टन शांभवी पाठक, कॅप्टन सुमित कपूर, पिंकी माळी आणि पीएसओ विदीप जाधव यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेत अनेक जीव गेले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ईश्वर सर्वांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावना पी.व्ही सिंधूने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथे नेण्यात असून उद्या बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह हेही अंत्यंसस्कारासाठी येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोनवरुन शरद पवारांचे सांत्वन केले. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून अजित दादांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला मुकल्याची भावना भरल्या डोळ्यांनी व्यक्त केली. 