टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत सलग चौथा सामना जिंकण्यात अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये भारतासमोर 216 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताने याआधी 209 धावांचाच यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी विक्रमी धावसंख्या गाठण्याचं आव्हान होतं. मात्र भारताला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने भारताला 8 बॉलआधीच गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचा डाव हा 18.4 ओव्हरमध्ये 165 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने यासह या 5 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.
भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. टीम सायफर्ट (62) आणि डेव्हॉन कॉनव्हे (44) या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. तसेच डॅरेल मिचेल याने 39 आणि ग्लेन फिलिप्स याने 24 धावांचं योगदान दिलं. तर इतरांच्या मदतीने न्यूझीलंडने 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीकडून भारताला वेगवान सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडने भरताला पहिल्याच बॉलवर मोठा झटका दिला.
अभिषेक शर्मा हा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 8 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. संजू सॅमसन आणि रिंकु सिंह या दोघांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. संजू 24 आणि रिंकुने 39 धावा केल्या. हार्दिकने 2 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
भारताचा पराभव
हर्षित राणा आणि शिवम दुबे या जोडीने फक्त 27 बॉलमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप केली. शिवमने या दरम्यान फक्त 15 चेंडूत 6 षटकारांसह वादळी अर्धशतक झळकावलं. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. मात्र शिवम नॉन स्ट्राईक एंडवर दुर्देवीरित्या आऊट झाला. शिवम आऊट होताच भारताची विजयाची आशा मावळली. शिवमने अवघ्या 23 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 3 फोरसह सर्वाधिक 65 रन्स केल्या.
शिवम आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या उर्वरित फलंदाजांना झटपट आऊट केलं आणि डाव गुंडाळला. न्यूझीलंडसाठी कॅप्टन मिचेल सँटनर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. इश सोढी आणि जेकब डफी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री आणि झॅकरी फॉल्क्स या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.