नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त (Republic Day 2026)नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Tableau) पहिल्या क्रमाकांचे बक्षीस मिळालं आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची यंदाची संकल्पना ही गणेशोत्सवाची होती आणि तो चित्ररथ सर्वोत्कृष्ठ ठरला आहे. द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला. केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्र राज्याकडून गणेशोत्सवाची संकल्पना मांडण्यात आली होती. तुषार प्रधान, रोशन इंगोले , कृष्णा सालवटकर, श्रीपाद भोंगाडे यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला आकार दिला होता. विविध निकषांवर झालेल्या मूल्यांकनानंतर महाराष्ट्राला प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला.
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर महाराष्ट्राच्या चित्ररथावर सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दर्शन घडलं. महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे आणि गणपती बाप्पाची मूर्ती अशी सजावट होती. गणेशोत्सव आज असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यावरूनच गणेशोत्सव-आत्मनिर्भरतेचे प्रतिक ही संकल्पना चित्ररथातून सादर केली गेली.
यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता कशी आणली जाते, हे दाखवण्यात आलं. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख क्षण आहे. गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते, हा संदेश चित्ररथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र येण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सवचे स्वरुप दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. मुंबईसह राज्यातील असंख्य मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मूर्तीकार, सजावट करणाऱ्यांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार होणारी आर्थिक साखळी हा चित्ररथाचा मुख्य विषय होता.
या वर्षीच्या परेडमध्ये एकूण 30 चित्ररथांनी भाग घेतला. 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागातील चित्ररथाचा यामध्ये समावेश होता. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत ही यंदाची थीम होती.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याचा चित्ररथ सहभागी होणार यासाठी एक समिती निर्णय घेते. यामध्ये कलाकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते सामील असतात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून राज्यांच्या चित्ररथांना परेडमध्ये समाविष्ट केले जाते.