Sangli Accident : वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सातवीतील विद्यार्थी जागीच ठार; चाकाखाली डोके सापडले अन्...
esakal January 29, 2026 10:45 AM

पलूस (सांगली) : नेहमीच सुसाट आणि बेजबाबदारपणे गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व इतर अवजड वाहनांची प्रचंड रहदारी असणाऱ्या पलूस येथील आमणापूर रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलला जोरदार धडक (Sangli Accident News) दिली. यामध्ये पलूस येथील अर्णव अमित पवार (वय १२) या सातवीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्णवच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे पलूस शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच सुसाट डंपर व इतर वाहनांवर कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काल सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे अर्णव पवार हा पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर या शाळेत निघाला होता. मात्र, सायकलच्या चाकामध्ये हवा कमी आहे, हे लक्षात आल्यानंतर तो पलूस येथील आमणापूर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सायकल दुकानात हवा भरण्यासाठी गेला होता.

Baramati Plane Crash : विमान दुर्घटनेत सातारच्या विदीप जाधव यांचाही मृत्यू, अजितदादांचे PSO म्हणून होते कार्यरत

हवा भरल्यानंतर तो शाळेकडे निघाला होता. तोच पलूस- आमणापूर या मार्गावरून निघालेल्या चालकाने डंपर हयगयीने, अविचाराने चालवून अर्णवच्या सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत अर्णव डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे अर्णवचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. याबाबत अर्णवचे चुलते अमोल बाळासो पवार (वय ३७, ११ वरील तालीम, पलूस) यांनी पलूस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, नेहमीच वाहनांची प्रचंड रहदारी असणाऱ्या पलूस-आमणापूर रस्त्याच्या वाहतुकीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अरुंद रस्ता असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी वाहने रस्त्यावर पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याकडे दुर्लक्ष आहे. या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.