प्रतिनिधी/ बेंगळूर
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुधवारी कर्नाटक विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सभागृहाला अत्यंत जड अंत:करणाने सांगत आहे, असे सभाध्यक्षांनी म्हटले.
अजित पवार यांनी सहावेळा आमदार आणि एकवेळ लोकसभेचे खासदार म्हणून काम केले होते. केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रात मंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही योगदान दिले होते. त्याच्या अकाली निधनामुळे देशाने एक उत्तम नेता गमावला आहे, अशा शब्दात दु:ख व्यक्त केले.
शोकप्रस्तावावर मंत्री एच. के. पाटील, विरोधी पक्षनेते आर. अशोक, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सुरेश बाबू, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी यांनी अजित पवार यांच्या कार्याची आणि सेवेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहात एक मिनिट मौन पाळून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.