रस्ता सुरक्षेचे विद्यार्थ्यांना धडे
वाहतूक कायदा नियमांची विद्यालयात जनजागृती
वसई, ता. २८ (बातमीदार)ः वाहन चालवताना अनेकांना नियमांचा विसर पडतो. आजची तरुण पिढी यात कुठेतरी आघाडीवर आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षा अभियानासाठी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट महाविद्यालयात सोप्या, सहज भाषेत कायदा, नियम समजावून सांगत आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय वाहतूक विभाग-२ च्या संयुक्त विद्यमाने ३६ वा रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. याच अनुषंगाने वसई रोड पूर्व येथे विकासिनी दृक महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये पोलिस निरीक्षक गुंजकर, पोलिस उपनिरीक्षक ताडवी, एनजीओ राधे फाउंडेशनच्या डॉ. रिटा सावला, वसई विकासिनी संस्थेचे सरचिटणीस विश्वस्त विजय वर्तक, पोलिस उपनिरीक्षक संतोष पोफळे, पोलिस हवालदार सर्वश्री बावधाने, प्रभाकर पाटील, काजल पाटील उपस्थित होते. या वेळी वाहतूक रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. तसेच धकाधकीच्या जीवनामध्ये वाहन, प्रवासातील महत्त्वाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
-----------------------------------------------
खेळीमेळीने संवाद
वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत, वाहन मार्गक्रमण करताना सिग्नलचे नियम पाळावेत, यासाठी जागरूकता करावी, या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पोलिसांनी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत आहेत.
----------
तरुणाईच्या उंबरठ्यावर वाहनांकडे आकर्षित होत असतात. मात्र, वाहन चालवण्यासाठी असलेले नियम त्यांना ज्ञात व्हावे, यासाठी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आले. त्यामुळे हे मार्गदर्शन तरुणांच्या भविष्याला प्रेरणा देईल.
- विजय वर्तक, विश्वस्त, सरचिटणीस, महाविद्यालय