सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवून उपमुख्यमंत्री होणार? अजितदादांच्या राजकीय वारसावरुन पडद्यामागे जोरदार हालचाली
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई January 29, 2026 08:43 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अनंतात विलीन झाले आहेत. परंतु त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. त्यासंबंधी पडद्यामागे राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यातच आता सुनेत्रा पवारांनाच (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री करा अशी एक मागणी जोर धरताना दिसत आहे. राज्यसभेवर असलेल्या सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्ष करावे आणि त्यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूकही लढवावी अशी मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असताना, तशी पावलंही पडत असताना अजित पवारांचे निधन झाले. त्यामुळे आता त्यांचा राजकीय वारसदार कोण याची चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. तर नरहरी झिरवाळांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे हंगामी अध्यक्ष केलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. 

Baramati Byelection : बारामतीची पोटनिवडणूक लढवणार? 

सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तर अजित पवारांचे दोन्ही पुत्र, पार्थ आणि जय पवार हे सक्रिय राजकारणात नसले तरी पडद्यामागून पक्षसंघटनेमध्ये सक्रिय असल्याचं दिसतंय. असं असलं तरी या तिघांनाही राजकारणाचा तितकासा अनुभव नाही. 

अजित पवारांच्या निधनानंतर एक उपमुख्यमंत्रिपद सध्या रिक्त आहे. पुढच्या सहा महिन्यात बारामती विधानसभा पोटनिवडणूकही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर सुनेत्रा पवारांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवावी आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं अशी एक मागणी जोर धरताना दिसत आहे. 

NCP Alliance News : राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा

राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक बडे नेते अजित पवारांसोबत राहिले. आता दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे अचानक निधन झालं.

राष्ट्रवादीच्या एकीकरणासाठी स्वतः अजित पवार हे आग्रही होते असं म्हटलं जात आहे. शरद पवारांच्या वाढदिवसादिवशीच, म्हणजे 12 डिसेंबर रोजीच दोन्ही राष्ट्रवादींचे एकीकरण करून पवारसाहेबांना सरप्राईज देण्याची इच्छा अजित पवारांची होती, पण काही कारणामुळे ते शक्य झालं नसल्याचं वक्तव्य अंकुश काकडे यांनी केलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे एकीकरण करून त्याचं नेतृत्व पुन्हा एकदा शरद पवारांच्या हाती देणं हा एक पर्याय असल्याची चर्चाही सुरू आहे.

Ajit Pawar NCP Party Political Future : अजितदादांसोबतचे नेते तयार होणार? 

अजित पवारांसोबत गेलेले नेते हे महायुतीमध्ये मंत्री बनले. सत्तेसाठी हे नेते भाजपसोबत गेले, आणि त्यातील बऱ्याच जणांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवायाही थांबल्या. आता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या आणि पुन्हा शरद पवार प्रमुख बनले तर त्याला अजितदादांसोबतच्या गेलेले नेते तयार होतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शरद पवार हे सध्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. त्यांच्यासोबत जाणं, त्याचे नेतृत्व स्वीकारणे म्हणजे सत्तेतून बाजूला जावं लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीतील बडे नेते ही भूमिका स्वीकारतील का हे पाहावं लागेल. 

दोन्ही राष्ट्रवादींचे एकीकरण झाले आणि शरद पवारांनी एनडीएसोबत जाण्याची भूमिका घेतली तर त्याला या नेत्यांचा विरोध नसेल. मात्र पवारांनी जर महाविकास आघाडीसोबत कायम राहायचं ठरवलं तर मात्र छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची पंचायतही होण्याची शक्यता आहे. यातील काही नेत्यांना त्यांच्यावरील कारवाया थांबवण्यासाठी भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसेल असंही बोललं जातंय.

Maharashtra Politics : भाजपची भूमिका काय असेल?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढची भूमिका, पुढचं पाऊल टाकलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. केंद्रात आणि राज्यात बळकट सत्ता असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रं कुणाकडे जावीत हे ठरवण्यामध्ये भाजप निर्णायक भूमिका घेऊ शकते. भाजपच्या चाणाक्यांकडूनही तशा हालचालीही केल्या जाण्याची शक्यता आहे. आपल्याला सोईचं होईल, पुढील राजकारण सोपस्कर होईल, तशी भूमिका घेणाऱ्याच्या हाती राष्ट्रवादी पक्षाची सूत्रं राहतील यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. 

पक्ष संघटनेवर एकहाती वर्चस्व असलेल्या अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असावा यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचं चित्र आहे. त्याचं उत्तरही आपल्याला लवकरच मिळेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.