Who was Vidip Jadhav? : राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं आज बारामती इथं झालेल्या विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यासह या विमानातून प्रवास करणाऱ्या पाचही जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. एक कर्तव्यदक्ष अन् शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. कोण आहेत हे विदीप जाधव? जाणून घेऊयात.
कोण आहेत विदीप जाधव?उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे PSO (Personal Security Officer) म्हणून कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचा आज सकाळी विमान अपघातात अजित पवारांसह मृत्यू झाला.
कर्तव्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्यानं पोलीस दलात शोककळा पसरली आहे. विदिप जाधव हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने जाधव कुटुंबियांवर तसंच त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. पोलीस दलाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बायको माहेरी गेली होती अन्...दरम्यान, चाळीत राहणाऱ्या अनेकांनी आज सकाळी विदीप यांना कामावर जाताना बघितले होते. त्यानंतर काही काळानंतर विमान अपघातात अजित पवारांसह विदीप जाधव (Vidip Jadhav) यांच्या मृत्यूची बातमी सकाळी टीव्हीवर पाहिल्यानंतर मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आईनं टाहो फोडला. यानंतर ते राहत असलेल्या चाळीतील आजूबाजूचे लोक जमा झाले.
यानंतर काही वेळातच पोलीस विदीप जाधव यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले. दुर्देव म्हणजे कालच विदीप जाधव यांची पत्नी पनवेलला माहेरी गेली होती. विदीप यांच्यामागे आता आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असं कुटुंब आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आणि नेहमी मदतीला धावणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख होती.