रणजी ट्रॉफीच्या सातव्या टप्प्यातील सामन्यात मुंबई आणि दिल्ली हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघ ग्रुप डी मध्ये असून मुंबईचा संघ टॉपला आहे. तर दिल्लीचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दिल्लीला कमबॅकसाठी हा सामना जिंकणं भाग आहे. तर पुढच्या फेरीसाठी मुंबई या सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्नात आहे. असं असताना या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळालं. सरफराज खान या सामन्यात मास्क घालून क्षेत्ररक्षणाला उतरला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खानही मास्क घालूनच मैदानात उतरला होता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. असं काय झालं की मुंबईच्या खेळाडूंना मास्क परिधान करून मैदानात उतरावं लागलं. पहिल्यांदा काही जणांनी अंदाज बांधला की हवा प्रदूषित असल्याने सरफराजने असं केलं असावं. पण त्याचं कारण काही वेगळंच होतं. काही पत्रकारांनी या मागचं कारण सोशल मीडियावर स्पष्ट केलं.
रणजी ट्रॉफी सुरू असलेल्या मैदानाशेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे सरफराज खानने मास्क घातलं होतं. मुंबई दिल्ली यांच्यात सामना सुरु आहे तिथेच बांधकाम सुरू आहे. त्यामुळे मैदानात धुळीचं साम्राज्य होतं. त्यामुळे सरफराज खानने मास्क घातलं. मुशीर खान आणि हिमांशु सिंहनेही मास्क घातलं. मुंबईची एक्यूआय 150 पेक्षा जास्त आहे आणि ते खूपच जास्त आहे.
मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि दिल्लीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. दिल्लीने पहिल्या दिवशी सर्व गडी गमवून 221 धावा केल्या. यानंतर पहिल्या मुंबईला फक्त 3 षटकांचा खेळ खेळता आला. दिल्लीकडून सनत संगवानने 218 चेंडूत 118 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त वैभव कंदपालने 32 आणि प्रणव राजवंशीने 39 धावांची खेळी. तर इतर फलंदाजांना 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. मुंबईकडून मोहन अवस्थीने 5, तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दिल्लीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईला पहिला धक्का बसला आहे. आकाश आनंद 4 धावा करून बाद झाला. अखिल हरवडकर नाबाद 4 आणि तुषार देशपांडे नाबाद 0 धावांवर खेळत आहेत.