मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना गहिवरल्या भावनेने श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ.हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस.चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मंत्रालयातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल बुधवारी बारामती विमानतळाजवळ धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान "अजितदादा अमर रहे" चा अखंड जयघोष करण्यात आल्या त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रमुख नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजितदादा या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे. सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.