Ajit Pawar: साताऱ्यासाठी दादांचे मोलाचे योगदान
esakal January 29, 2026 11:46 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझ्या आयुष्यातील एक मार्गदर्शक, प्रेरणादायी नेतृत्व आज हरपले. साताऱ्याच्या विकासासाठी अजितदादांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणारे नाही. त्यांच्या आठवणी सदैव सातारावासीयांच्या मनात जिवंत राहतील. साताऱ्याच्या विकासात अजितदादांच्या योगदानाचा घेतलेला आढावा...

- राजेंद्र चोरगे, सातारा

Ajit Pawar: दादा आणि साताऱ्याचं अतूट नातं!

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक या नात्याने साताऱ्याच्या विकासासाठी अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांचा व प्रत्यक्ष साकार झालेल्या कार्याचा मी जवळून साक्षीदार आहे. २००२ मध्ये अजितदादा पालकमंत्री असताना आमची कोणतीही वैयक्तिक ओळख नसताना त्यांनी मला भेटीस बोलावले. त्या भेटीदरम्यान त्यांनी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती घेतली. त्या वेळी आम्ही त्यांना कैलास स्मशानभूमीचा मॉडेल दाखविला. ते पाहून त्यांनी “अशी सुसज्ज स्मशानभूमी उभी राहू शकते का?” आश्चर्य व्यक्त करत उद्गार काढले.

प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर हे काम कसे पूर्ण करणार? याबद्दल त्यांना विशेष कुतूहल होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी स्वतः जुन्या स्मशानभूमीची पाहणी करण्याची इच्छा दर्शविली. ठरल्यानुसार आम्ही सर्वजण सकाळी सात वाजता स्मशानभूमीत भेटलो. त्यावेळी आम्हाला दादा वेळेचे किती कटिबद्ध आहेत, हे समजले. प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. तेथील परिस्थिती पाहिल्यावर सुसज्ज स्मशानभूमी सातारकरांसाठी किती गरजेची आहे, हे जाणले. त्यांनी मार्गदर्शनही केले. या कामासाठी त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर प्रत्येक वेळी साताऱ्याला आल्यानंतर स्मशानभूमीच्या कामाची पाहणी केली.

अजितदादांनी दाखविलेला हा विश्वास, त्यांची सामाजिक बांधिलकी आणि साताऱ्याच्या विकासासाठीची तळमळ माझ्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे. यामुळे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी लोकसहभागातून आणि अजितदादांच्या सहकार्यातून सातारकरांसाठी अजरामर होईल, असे कैलास स्मशानभूमीचे काम साकार केले.

जिल्हा क्रीडा संकुलासाठी निर्णायक भूमिका

जिल्हा क्रीडा संकुल प्रकल्प २००३ पासून रखडला होता. शासनाने दोनदा निविदा काढल्या होत्या, मात्र ठेकेदार मिळत नसल्याने प्रकल्प पुढे सरकत नव्हता. २००५ मध्ये पालकमंत्री असताना अजितदादांनी पुढाकार घेत सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठितांची बैठक सातारा येथील हॉटेलमध्ये आयोजित केली. यावेळी आता हा प्रकल्प झाला नाही, तर पुन्हा कधीच होणार नाही, असे स्पष्ट सांगून त्यांनी सर्व सातारकरांना एकत्र येऊन कुणीतरी पुढाकार घेऊन काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. या निविदेत सर्वात कमी किंमत माझी असल्याने ओघाने हे टेंडर मला मिळाले. या संदर्भात दादांना बारामती येथे भेटण्यास गेलो असता, त्यांनी माझे अभिनंदन करून जिल्हा क्रीडा संकुल हे भावी पिढीच्या खेळाडूसाठी पंढरीच असते, आपल्या साताऱ्याला चांगल्या खेळाडूंचा इतिहास आहे. हे काम अत्यंत दर्जेदार व वेळेत होणे आवश्यक आहे, असे सूचित केले. त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.

त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला तोंडी हमी जरी दिली असली, तरी प्रत्यक्ष जातीने लक्ष घालत आपलं शब्द तंतोतंत पाळला. संकुलाच्या तीन वर्षे बांधकामाच्या कालखंडात १५ वेळा स्वतः भेट देऊन कामाच्या दर्जाची पाहणी करून, चुकत असेल तिथे मार्गदर्शन करून सहकार्य तर केलेच, तसेच शासनाकडून येणारी रक्कम वेळेवर मिळावेत, यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाला हाताशी घेऊन सूचना देत मंत्रालयात मुख्य सचिव, क्रीडामंत्र्यांसोबत मी व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सर्व अडचणींवर मार्ग काढला. त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पहिले व वेळेत पूर्ण होणारा प्रकल्प अस्तित्वात आला, तो दादांच्या सहकार्यामुळेच.

Ajit Pawar: जिल्हा बॅंकेचा हरपला आधारवड

२०२३ मध्ये ज्या वेळी कैलास स्मशानभूमीतील गॅसदाहिनी लोकार्पण सोहळा होता. त्यांनी गुरुकुलला भेट दिली होती. गुरुकुलची पाहणी करून, शाळेचे व्यवस्थापन, कार्य, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. गॅसदाहिनीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यापूर्वी संपूर्ण स्मशानभूमीची पुन्हा पाहणी केली. त्यांनी त्यावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे कौतुक केले. २० वर्षे पूर्ण होऊन कोणतेही अनुदान नसताना सातारकरांच्या सहकार्याने स्वच्छ, निटनेटकी ठेवलेली असल्याचे सांगून त्यांनी कौतुक केले. या वेळी त्यांच्या हस्ते स्मशानभूमीत पिंपळाचे रोपही लावले. अजून काही साताऱ्याच्या विकासासाठी सामाजिक व गरजेचे प्रकल्प असल्यास मला नक्की सांगा, सहकार्य करेन, असेही त्यांनी सांगितले. या अनुषंगाने सात ते आठ महिन्यांपूर्वी सर्किट हाऊस येथे कृष्णा- वेण्णा संगमावर असलेला घाट विकसित करण्याचा प्रकल्प छायाचित्रांसह दादांना दाखविला. तो पाहून दादांनी जागेवरच तत्त्वतः मान्यता दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.