BLOG : म्हणजे खरं तर मी नि:शब्द झालेय. तरीही मनातलं तुमच्यासमोर मांडतेय. माझा लाडका लेक आज माझ्याच कुशीत कायमचा विसावलाय. म्हणजे खरं तर याच मातीत त्याने त्याचा राजकीय प्रवास सुरू केला. आधी दिल्लीत गेला आणि मग राज्याच्या राजकारणात लोणच्यासारखा मुरला. उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला तब्बल सहा वेळा. अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. मायेची असंख्य माणसं जोडली. या साऱ्या प्रवासात मी त्याच्यावर आणि त्याने माझ्यावर भरभरून प्रेम केलं.
काकांनी रोवलेल्या विकासाचं बीज त्याने वटवृक्षात रुपांतरित केलं. रस्ते, वाहतूक व्यवस्था, अगदी एसटी डेपोचादेखील दर्जा सुधारला. माझा हा लाडका लेक अजित महाराष्ट्रभर संचार करत असे. पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असे. प्रचारसभा, विकासकामांची उद्धाटनं हेतू अनेक. पण, त्याचं झपाटलेपण तेच. लोकांसाठीचं प्रेम, ओलावा तोच.
याच माझ्या बारामतीच्या मातीतही त्याने अनेक सभा गाजवल्यात. अनेक कार्यक्रमांमध्ये लोकांची मनं जिंकलीत. त्याच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावावर तुम्ही महाराष्ट्रभरातल्या लोकांनी भरभरून प्रेम केलंत. त्याला आनंदाच्या क्षणी तसंच संघर्षाच्या काळातही साथ दिलीत. त्यानेही तुमच्या लेकराबाळांवर आपल्या कुटुंबासारखी माया केली. तेच प्रेम आज मी पाहत होते. जेव्हा तो अचानक तुम्हाला आणि मलाही सोडून कायमचा गेला. शांत झाला.
आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जो जनसागर लोटला ती त्याची आयुष्यभराची मिळकत होती. किंबहुना राज्यभरात आज जे जे लोक धाय मोकलून रडले, त्या डोळ्यातून येणाऱ्या भावना याच प्रेमापोटी होत्या. एरवी ज्या माझ्या भूमीत त्याने कारकीर्दीतली प्रगतीची पावलं टाकली, त्याच माझ्या भूमीत तो कायमचा शांत झाला. लेकी बाळी, आज्या, सारेच ढसाढसा रडत होते. कुणालाही शब्द सुचत नव्हते. वाहत होता तो फक्त अश्रूंचा पूर. आज माझी माती ओली झाली. ती दु:खाश्रूंच्या नदीने.
'माझं अस्तित्वच संपलंय, आता काही उरलं नाही, पुढे आम्ही काय करायचं,' हे कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे शब्द काळीज चिरून टाकत होते. हा माझा लेक गेल्याने फक्त पवार कुटुंबच नाही तर महाराष्ट्र नावाचं कुटुंबही गलबलून गेलं. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारं एक वादळ थांबलं... मनामध्ये अस्वस्थतेचं, असहाय्यतेचं वादळ निर्माण करून...