Yuvraj Singh : निवृत्ती का घेतली? युवराजचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, मला पाठिंबा मिळत नव्हता, आधीसारखा आदर...
esakal January 29, 2026 11:46 PM

Yuvraj Singh emotional confession cricket: भारतीय संघाचा महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने त्याच्या निवृत्तीमागचं खरं कारण सांगितले आहे. युवीने जून २०१९ मध्ये निवृत्ती जाहीर केली. त्यावर्षी झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने इंडियन प्रीमिअर लीग व आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्याने क्रिकेट कारकीर्दित अनेक चढउतार पाहिले आणि कॅन्सरवर मात करून पुन्हा मैदानावर उतरण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

४४ वर्षीय युवीने खुलासा केला की, त्याला क्रिकेट खेळताना पूर्वी मिळणारा आनंद, मिळेनासा झाला होता. त्याने स्पष्ट केले की, त्याच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याच्या सभोवतालच्या लोकांकडून त्याला मिळालेला आदर आणि प्रोत्साहनाचा अभाव. युवराजला मानसिक, शारीरिक आणि भावनिक थकवा वाढल्यामुळे साजेशी कामगिरी करता येत नव्हती.

Ishan Kishan: सूर्यकुमार यादव खोटं बोलला? इशानला न खेळवण्यामागे सांगितलेलं कारण चुकीचं... गंभीरचा मॅसेज घेऊन आला अन्...

युवराज सिंगने २०१७ मध्ये भारताकडून शेवटचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता. २०१२ मध्ये तो शेवटची कसोटी मालिका खेळला होता. २०११ च्या वर्ल्ड कप विजयानंतर युवीला कॅन्सर झाल्याचे समोर आले होते आणि त्यावर मात करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनही केले होते. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती.

तो म्हणाला, "मी माझ्या खेळाचा आनंद घेत नव्हतो. त्याचा आनंद मिळत नाही, मग मी क्रिकेट का खेळत आहे ? मला पाठिंबा मिळत नव्हता. मला स्वतःला समर्थित आणि सन्मानित वाटत नव्हतं. मी अशा गोष्टीत का रमतोय ज्याचा मला आनंद मिळत नाही? मला खेळण्याची गरज का आहे? काय सिद्ध करण्यासाठी? मी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, आणि याचे मला दुःख वाटत होतं," असे युवराजने माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा ( Sania Mirza) सोबतच्या पॉडकास्टमध्ये सांगितले.

IND vs NZ, 4th T20I: '... तर सामन्याचा निकाल वेगळा दिसू शकला असता', सूर्यकुमार भारताच्या पराभवानंतर काय म्हणाला?

युवराजने भारतासाठी ४० कसोटी सामन्यांत ३ शतकं व ११ अर्धशतकांसह १९०० धावा केल्या. ३०४ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा आहेत आणि त्यात १४ शतकं व ५२ अर्धशतकं आहेत. ५८ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने ११७७ धावा केल्या. भारताच्या २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील नायक तो होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.