वाल्मीक पठाराची लेक धावली अन् जिंकलीही
तामिनेतील सायली कदमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशाने ग्रामस्थ आनंदले
ढेबेवाडी, ता. २९ : घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम वाल्मीक पठारावरील तामिने (ता. पाटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सायली अधिक कदम हिने अडचणींवर मात करत जिल्हा स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हा परिषदेने आयोजिलेल्या यशवंतराव चव्हाण बालविकास क्रीडा स्पर्धेत केंद्र स्तरावरून सुरू झालेला सायलीचा प्रवास बीट व तालुकास्तरीय स्पर्धा जिंकत जिल्हास्तरापर्यंत पोहचला. मैदानाचा अभाव, मर्यादित साधनसामग्री असतानाही सायलीने शिक्षकांचे मार्गदर्शन, इच्छाशक्ती, आत्मविश्र्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेत उतरून शंभर मीटर धावण्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मोठे मैदान, शहरातील स्पर्धक, प्रशिक्षण घेतलेल्या मुली या भीतीला सायलीने दूर ठेवून फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले आणि ती यशस्वी झाली, असे शिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापक भीमाशंकर शेतसंदी, वर्गशिक्षक हर्षल पाटील आणि पालकांचे मार्गदर्शन तिला लाभले.
-------------------
(चौकट)
सायलीच्या हस्ते ध्वजवंदन
--------
सायलीच्या यशाने तामिनेतील ग्रामस्थ आनंदले आहेत. प्रजासत्ताक दिनाला तिच्या हस्ते ध्वजवंदन करून विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सायलीने यापूर्वीही अनेक स्पर्धांतून यश मिळविले आहे.
-------------------------
(फोटो)26B08052
सायली कदम
------------------