धक्कादायक घटना! चित्रपटगृहात पती शेजारी बसला नाही म्हणून पत्नी चिडली, थेट चाकूने…
Tv9 Marathi January 30, 2026 09:46 PM

पती आणि पत्नीचे नाते हे खास असते. दोघेही आयुष्यातील पडत्या काळात एकमेंकाना साथ देतात, अनेक कठीण प्रसंगांना समोरे जातात. कधीकधी तर पती-पत्नीमध्ये टोकाची भांडणे देखील होतात. पण एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नी कुटुंबियांसोबत चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गेलेले असतात. पण पती पत्नीच्या शेजारी बसण्याऐवजी मित्राच्या शेजारी बसतो. या वरुन दोघांमध्ये इतका टोकाचा वाद होतो की पत्नीने थेट चाकूने हल्ला केला आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे एक अतिशय किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये इतका तीव्र वाद झाला की, पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केला. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटना कशी घडली?

26 जानेवारी रोजी दुपारी आशिष शंकर मिश्रा (वय ३९, नाकाडोंगरी) हे आपली पत्नी शिवानी मिश्रा, मुलगी आणि दोन मित्रांसह तुमसर येथील चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट सुरू असताना आशिष यांनी आपल्या पत्नीच्या शेजारी ऐवजी मित्राच्या शेजारी जागा घेतली. या छोट्याशा गोष्टीमुळे शिवानी खूप संतापली. चित्रपट पाहून परतताना आणि घरी पोहोचल्यानंतरही दोघांमध्ये यावरून जोरदार वाद झाला.

रात्री वाद विकोपाला

त्या दिवशी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आशिष घरी कपडे बदलत होते. तेव्हा शिवानीने पुन्हा त्याच विषयावरून शिवीगाळ सुरू केली आणि भांडण वाढवले. रागाच्या भरात ती स्वयंपाकघरात गेली, भाजी कापण्याचा चाकू घेतला आणि थेट पतीवर वार करण्याचा प्रयत्न केला. आशिष यांनी बचाव करण्यासाठी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, तरीही चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ लागला. यात ते गंभीर जखमी झाले आणि रक्तस्त्राव सुरू झाला.

पोलिस कारवाई झाली

जखमी आशिष यांनी तात्काळ गोबरवाही पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिवानी मिश्रा यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल लंकेश्वर रघुर्ते करीत आहेत. ही घटना दाखवते की, छोट्या छोट्या गोष्टींमुळे कौटुंबिक वाद किती हिंसक स्वरूप घेऊ शकतात. स्थानिक पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाई सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.