भारत सुंदर ठिकाणांनी समृद्ध असलेला देश आहे. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत या देशातील शहरे अनेकदा मागे राहतात. असे असले तरी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आशियातील सर्वात स्वच्छ गाव हे भारतातच आहे. लोक या गावची स्वच्छता, शिस्त आणि पर्यावरणीय जागरूकता पाहून आश्चर्यचकित होतात. चला या खास गावाबद्दल जाणून घेऊया…( Most cleanest village in Asia )
मावलिनॉन्ग
मावलीननॉंग हे छोटेसे गाव आशियातील सर्वात स्वच्छ गावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे गाव ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे. भारत-बांगलादेश सीमेजवळ हे गाव आहे. या गावात बांबूचे कचरापेट्या असून प्लास्टिकवर बंदी आहे. संपूर्ण मार्गावर फुलांच्या कुंड्यांची रांग असते. इथे झाडांच्या मुळांपासून बनवलेला एक अद्भुत पूलही आहे.
लोकसंख्या किती?
मावलीननॉंग या गावची लोकसंख्या सुमारे ५०० ते ९०० असल्याचा अंदाज आहे. तसेच इथे १०० कुटुंबे राहतात असे सांगितले जाते.गावात खासी जमातीच्या समुदायाचे रहिवासी आहेत. हे लोक प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. तिथे सुपारीची शेती केली जाते. उन्हाळ्यात तिथे अननस आणि लिची या फळांचेही उत्पादन घेतले जाते. खासी समाज मातृवंशीय आहे, म्हणजेच मालमत्ता आणि वारसा आईकडून मुलीकडे, विशेषतः सर्वात लहान मुलीकडे जातो. येथे महिलांना खूप आदर दिला जातो आणि त्या कुटुंबाच्या प्रमुखही असतात.
हेही वाचा: Nivati Beach : हे आहे कोकणातील मिनी मालदीव, सौंदर्य पाहून व्हाल थक्क !
असे आहे गाव
२००३ मध्ये डिस्कव्हर इंडिया मासिकाने या गावाला आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून घोषित केले. इथे प्रत्येक घराबाहेर हाताने बनवलेले बांबूची कचराकुंडी ठेवलेली असते. प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडाची शिक्षा दिली जाते. गावातील तरुण आणि वृद्ध अगदी प्रत्येकजण दररोज सकाळी रस्त्यावर झाडू मारून स्वच्छता करतात. कचरा गोळा करून त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर केले जाते, ज्यामुळे जमीन सुपीक राहते. गावात धूम्रपान करण्यास देखील मनाई आहे.