बंगळुरु : कॉन्फिडंट ग्रुपचे चेअरमन सीजे रॉय यांनी त्यांच्या बंगळुरुतील कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. आजच त्यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. सीजे रॉय यांचं वय 57 वर्ष इतकं होतं. आयकर विभागानं गुरुवारी सकाळी सीजे रॉय यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी केली होती. या छापेमारीत सीजे रॉय यांच्याकडे उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती किंवा मालमत्ता असल्याचं स्पष्ट झालं होतं.
बंगळुरुतील अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्यालयात कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सीजे रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. यानंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, डॉक्टरांनी तपासणी करुन सीजे रॉय यांना मृत घोषित केलं, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी दिली.
आयकर विभागाच्या पथकाकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून छापेमारी आणि चौकशी सुरु होती. सीजे रॉय यांच्या भारताबाहेर असलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात पोलीस असल्याची माहिती आहे. कॉन्फिडंट ग्रुप कर्नाटक आणि केरळमध्ये कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छाप्यांमुळं सीजे रॉय अस्वस्थ झाले होते.
सीजे रॉय हे मूळचे केरळचे असून कोची येथील रहिवासी आहेत. सीजे रॉय हे मल्याळम चित्रपटांचे निर्माते देखील आहेत. मोहनलाल यांचा बिगबजेट सिनेमा कॅसानोवा याचा समावेश आहे.