मुंबई : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला मोठा ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 तासात चांदीच्या दरात 85 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 25 हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलं. एमसीएक्सवर काल चांदीच्या वायद्याचे दर 420000 च्या उच्चांकावर पोहोचले होते. 24 तासात चांदीचे दर 85000 रुपयांनी कोसळले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी चांदीच्या दरानं 420000 चा उच्चांक गाठला होता. तर, सोन्याचे दर 2 लाखांच्या जवळ पोहोचले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता 1 किलो चांदीच्या वायद्याचे दर 335001 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीनं 420048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. म्हणजेच 24 तासात चांदीचे दर 85000 रुपयांनी कमी झाले.
सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या वायद्याचे दर 193096 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यात 24 तासात 25500 रुपयांची घसरण झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली नफा वसुली हे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी सुरु होती. दररोज नवे विक्रम निर्माण होत होते. चांदीचे दर 3 लाखांहून 4 लाखांपर्यंत विक्रमी वेगानं वाढले होते. सोन्याच्या दरात देखील तेजी आली होती, यावेळीच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचा मार्ग निवडल्यानं सोने आणि चांदीचे दर घसरले.
काही तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीमध्ये विक्री वाढली तशी काही शॉर्ट सेलर्सलनं एंट्री केली आणि ट्रेडिंग दरम्यान चांदीला शॉर्ट केलं. यामुळं चांदीच्या दरात घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आणि धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पाहायला मिळाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या जागी पसंतीच्या व्यक्तीची निवड करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ज्यामुळं डॉलर मजबूत झाला असून याशिवाय काही ठिकाणी जागतिक तणाव कमी झाला आहे.
सोने आणि चांदीतील घसरणीमुळं सिल्वर आणि गोल्ड ईटीएफच्या दरात मोठी घसरण झाली. शेअर बाजार बंद होईपर्यंत सिल्वर आणि गोल्ड ईटीएफमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोन्याचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या रेटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 165800 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 161820 रुपये आहेत. 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 147560 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 134290 रुपयांवर आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरानं देखील एक लाखांचा टप्पा पार केला आहे. एका तोळ्याचे दर 106940 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर जीएसटीशिवायचे आहेत.
आणखी वाचा