भंडारा डोंगर ही तुकाराम महाराजांची चिंतन भूमी
esakal January 31, 2026 06:45 AM

तळेगाव दाभाडे, ता. ३० : ‘‘जगद्गुरू तुकाराम महाराजांचे रजकण भंडारा डोंगराच्या मातीला लागले आहेत. त्यामुळे या डोंगराच्या मातीचा प्रभाव आगळावेगळा आहे. महाराजांची ही चिंतन भूमी, आध्यात्मिक भूमी आहे,’’ असे प्रतिपादन संत नामदेव महाराज वंशज केशव महाराज नामदास यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिधी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकट वर्षानिमित्त छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण तसेच कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या सोहळ्यात सातव्या दिवसाची कीर्तनसेवा केशव महाराज नामदास यांनी केली.

‘‘तुकोबारायांनी भंडारा डोंगरासह भामचंद्र व घोरवडेश्वर या तीन ही डोंगरावर चिंतन करीत मोठी तपश्चर्या केली. महाराज कोणत्या डोंगरावर जाणार हे जिजाईंना सांगत नसत. घरचे उरकून जिजाई महाराजांच्या शोधात निघत व वाटेवरील मातीला कान लावून विठ्ठल-विठ्ठल असा आवाज येई त्या दिशेने जात. महाराज दिसले, की त्या त्यांना न्याहारी देत. महाराजांनी भोजन केल्यानंतरच त्या भोजन घेत असत.
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ।।
प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटी परीस सत्य ।।
संत एकनाथ महाराजांनी संत नामदेव महाराजांचा महिमा वर्णन केलेल्या या अभंगावर केशव महाराज यांनी कीर्तनसेवेतून निरूपण केले. ‘‘प्रत्यक्ष दास असलेले नामदेवराय हे विठोबाचे फारच लाडके भक्त होते. नामदेव महाराजांनी प्रगल्भ कवित्वतेने सर्व जनास तारले. अंत:करणाने निर्मळ असलेल्या नामदेवांनी सर्व मानवजातीला नामाचा महिमा सांगितला,’’ असे केशव महाराज म्हणाले.
सकाळच्या सत्रांत श्री ज्ञानेश्वरी व श्री गाथा पारायण झाले. ११ ते एक या वेळेत मुळशी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तनसेवा झाली. हरिपाठ होऊन दुपारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर छोटे माऊली महाराज कदम यांनी कथा सांगितली.

---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.